सिंधुदुर्ग : हवेत झेपावणारी विमाने अन् कमांडोंच्या थरारक कसरती | पुढारी

सिंधुदुर्ग : हवेत झेपावणारी विमाने अन् कमांडोंच्या थरारक कसरती

मालवण; पुढारी वृत्तसेवा : नौदल दिनाचे औचित्य साधून नौदलाने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनारी शिवछत्रपतीमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. वार्‍याच्या वेगाने हवेत झेपावणारी विमाने आणि तेवढ्याच तत्परतेने ती खाली येतानाचे द़ृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. भारतीय नौदलाच्या अफाट क्षमतेचे प्रदर्शन या निमित्ताने उपस्थितांना घडले.

दरवर्षी राजधानी नवी दिल्लीत होणारा नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त सिंधुदुर्गात पार पडला. यामध्ये नौदलाकडून मोहिमांवर आधारित विविध प्रात्यक्षिके तारकर्लीच्या समुद्रात सादर करण्यात आली. विमानवाहू युद्धनौकांसह अन्य युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, कमांडोंच्या कसरतींचा त्यामध्ये समावेश होता. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही प्रात्यक्षिके सुरू झाली. हेलिकॉप्टर, विमानांवर स्वार होत नौदलाच्या कमांडोंनी सादर केलेली प्रात्यक्षिके श्वास रोखून धरायला लावणारी होती. त्याचे सादरीकरण रविवारी नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमीत तारकर्ली समुद्रकिनारी करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींना नौदलाची मानवंदना

या नौदल दिनाच्या निमित्ताने चिपी विमानतळाचा ताबा नौदलाने घेतला होता. या कार्यक्रमात 40 लढाऊ विमाने आणि 18 हेलिकॉप्टरचा सहभाग होता. याखेरीज जहाजे, पाणबुड्या आणि विशेष दलांचे ऑपरेशन याप्रसंगी पार पडले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नौदलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

Back to top button