छत्रपती शिवरायांच्या नौदल सामर्थ्याला पंतप्रधानांचे वंदन | पुढारी

छत्रपती शिवरायांच्या नौदल सामर्थ्याला पंतप्रधानांचे वंदन

मालवण, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरद़ृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सागरावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तिमान हे सर्वात पहिल्यांदा त्यांनीच ओळखले. एवढेच नव्हे तर त्यांनीच विविध दुर्गांची उभारणी करून भारतीय नौदलाचा पाया रचला. त्यांच्या नौदल सामर्थ्याला माझे वंदन, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भारतीय नौदल आपला वर्धापन दिन येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर दिमाखात साजरा करत आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मोदी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आणि नौदलाच्या ध्वजावरील राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. नजीकच्या काळात भारत तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार असल्याचे सांगतानाच आगामी काळात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून सैन्याचा गरजा भागविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरीकुमार, लष्करप्रमुख जनरल अनिल चौहान, राज्यपाल रमेश बैस, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विनायक राऊत आदींसह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, नौसैनिक, कमांडो आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नौदल सामर्थ्याच्या प्रशंसनेने केली. मोदी म्हणाले, कोणत्याही देशासाठी सागरी मार्ग किती महत्त्वाचा असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे आणि नौदलाच्या ध्वजावरील राजमुद्रेचे अनावरण माझ्या उपस्थितीत झाले हे मी माझे माझ्य भाग्य समजतो. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गवर साजरा होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

भारताचा इतिहास गुलामीचा नव्हे; शौर्याचा आणि सामर्थ्याचा

भारताचा इतिहास गुलामीचा नव्हे तर शौर्याचा आणि सामर्थ्याचा आहे असे सांगत मोदी म्हणाले, एखाद्या देशासाठी सागरी सामर्थ्य किती महत्त्वाचे असते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले. समुद्रावर आपली हुकूमत निर्माण करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. आरमार शक्तिशाली व्हावे यासाठी महाराजांनी कान्होजी आंग्रे, हिरोजी इंदुलकर यांच्यासारखे दर्यावर्दी उभे केले. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल सामर्थ्याचे प्रतीक आहे.

कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध

आपल्या सागरी क्षेत्रातील लोकांचा विकास जवळपास ठप्प झाला होता. मात्र, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, 2014 नंतर देशात मत्स्य उत्पादन वाढले आहे. मच्छीमारांना किसान कार्डचाही लाभ मिळाला आहे. सागरी किनार्‍यांवर नवे उद्योग आणि व्यवसाय बहरावे यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपले सरकार केवळ सिंधुदुर्गचा नव्हे तर संपूर्ण कोकणपट्टीचा सर्वांगीण विकास करण्यास वचनबद्ध आहे.

नौदलातही महिलांचा समावेश : राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या देशाची नारीशक्ती संसदेपासून सर्वच क्षेत्रांत कार्यरत आहे. नौदलातही आता महिलांचा समावेश झाल्याचे त्यांनी गौरवपूर्वक सांगितले. ते म्हणाले, भारतीय नौदलाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच जगातील अन्य देशांना भारतीय नौदलाचा हेवा वाटतो. जगातील सर्वात शक्तिशाली नौदल अशी भारतीय नौदलाची ख्याती व्हायला हवी.

मोदींमुळे महाराष्ट्राचा विकास : मुख्यमंत्री

पहिले हर घर मोदी असे म्हटले जात होते. आता घर घर मोदी हा अनुभव येत आहे. केंद्र आणि राज्याच्या सहयोगाने महाराष्ट्राचा विकास होत आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज्य सुराज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्माण करत आहे. जगाला भारताचे सामर्थ्याचे दर्शन घडवण्याचे हे काम आहे. बलशाली भारत ही आमची नवीन ओळख आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवरायांचा 43 फूट भव्य पुतळा चार महिन्यांत उभारला

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तब्बल 43 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले. नौदलाने या पुतळ्याची उभारणी केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून या किल्ल्यावर पुतळा उभारण्याचे काम सुरू होते.

Back to top button