पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाचा आज दिमाखदार सोहळा | पुढारी

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाचा आज दिमाखदार सोहळा

मालवण; पुढारी वृत्तसेवा : ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ हे ब्रीदवाक्य असलेल्या भारतीय नौदलाच्या वतीने सोमवारी नौदल दिन साजरा होत आहे. भारतीय नौदलाचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पहिल्यांदाच आपल्या तळापासून दूर यंदाचा नौदल दिन साजरा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय नौदल आपली सर्वसमावेशक कार्यप्रणाली दर्शवणारी प्रात्यक्षिके दाखवत पराक्रम आणि क्षमतेचे शक्ती प्रदर्शित करणार आहे. नौसेनेचा प्रमुख कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसी जवळ होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्रिगण, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.

शिवपुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

राजकोट किल्ला येथे नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली येथील नौदल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलाचे सर्वात घातक मार्कोज कमांडो तब्बल आठ हजार फुटांवरून विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर झेपावणार आहेत. यापैकी एक प्रमुख कमांडो जमिनीवर उतरल्यावर नरेंद्र मोदी यांना भारतीय नौदलाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून प्रदान करणार आहे. यानंतर मान्यवरांची भाषणे होणार आहेत. नौदलाच्या कवायती संपल्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधन करणार आहेत.

Back to top button