सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा! | पुढारी

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा!

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत भाजपने २३ पैकी सरपंच पदाच्या १५ जागांवर विजय मिळवत विजयाची घौडदौड कायम ठेवली. ठाकरे गटाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागेल, गावपॅनलचे २ सरपंच विजयी झाले असून देवगड ठाकुरवाडी ग्रामपंचायतवर भाजपने दावा केला आहे. शिंदे गटाला सरपंच पदाच्या या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. भाजपा,ठाकरे गट व गाव पॅनलचे सरपंच विजयी होताच त्यांच्या समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील आवारात एकच जल्लोष केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकुण २४ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली होती. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-खुर्द ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित २३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी संपन्न झाल्या. दरम्यान आज तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीत भाजपने सरपंच पदाच्या २३ पैकी १५ जागांवर विजय मिळवला.

यामध्ये वालावल, भडगांव,आचरा, बोडण, ओटव, वळीवंडे, फणसगांव, पेंडुर, खानोली, मातोंड, वानीवडे, तिर्लोट, विठ्ठलादेवी, शिरवली, पावणाई या ग्रा.पं.चा समावेश आहे. तसेच देवगड मधील ठाकुरवाडी ग्रा.पं.वर भाजपने दावा केला आहे. ठाकरे गटाने ५ ग्रा.पं.च्या सरपंच पदावर विजय मिळवला असून यामध्ये वर्दे,हुमरमळा-वालावल,बेळणे-खुर्द, रामेश्वर, वायंगणी या ग्रामपंचायतचा समावेश आहे. तर गाव पॅनलने सरपंच पदाच्या दोन जागांवर विजय मिळविला. यामध्ये साटेली-भेडशी व अणाव-हुमरमळा या ग्रामपंचायतचा समावेश आहे. सत्ताधारी शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाला मात्र या ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीत एकही ठिकाणी सरपंच पदावर विजय मिळवता आला नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button