कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करा : खा. विनायक राऊत | पुढारी

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करा : खा. विनायक राऊत

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करुन कोकण रेल्वे स्वतंत्र झोन केला तरच केंद्रीय बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करून पायाभूत सुविधांची निर्मिती होवू शकते. सध्या कोकण रेल्वेला पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. पण तेवढा निधी कोकण रेल्वे महामंडळाकडे नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. भारतीय रेल्वेच्या नऊ विभागामध्ये दहावा विभाग कोकण रेल्वेचा स्वतंत्र कोकण झोन असा करण्यात यावा आणि भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला विविध सुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आपण केली असून यामुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही शीघ्र गतीने होऊ शकते, असे ते म्हणाले.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मालवण तळेगाव येथील निवासस्थानी असलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी. कोकणातील प्रवाशांना नव्या रेल्वे गाड्या मिळाव्यात. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी, अशा विविध मागण्या आहेत. मात्र कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत जोपर्यंत विलीन होत नाही, तोवर प्रवाशांची गैरसोय होत राहील, असे राऊत यांनी सांगितले.

गोवा आणि कर्नाटक राज्याने कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची गरज व्यक्त केली आहे. आता महाराष्ट्र राज्याने अनुकूल भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. भारतीय रेल्वेचे ९ झोन आहेत. त्याप्रमाणे कोकण रेल्वे दहावा झोन निर्माण करून केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी स्थान द्यावे. कोकण रेल्वे झोन स्वतंत्र ठेवताना कर्मचाऱ्यांच्या सेवा व सुविधांना कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, अशी खबरदारी घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत कोकण रेल्वेकडे पैसेच नाहीत रेल्वेचे दुपदरीकरण करण्यासाठी ३५ हजार कोटीची गरज आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर होणा-या टर्मिनसचा प्रश्न सध्यातरी अधांतरीच राहण्याची शक्यता आहे, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली.

भारतीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला आर्थिक तरतूद केली तरच पायाभूत सुविधांची निर्मिती होवू शकते. कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी २९ हजार कोटी प्रस्तावित होते, मात्र आज हा आकडा तब्बल ३५ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढा निधी कोकण रेल्वे महामंडळाकडे नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांची निर्मिती करताना आर्थिक अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत अनेक जण चर्चा करीत आहेत. परंतू कोण लढणार ते निवडणुकीच्या वेळी पाहू तूर्तास तरी मला मतदारसंघात काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button