

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये 20 जागांसाठी आतापर्यंत 125 नामनिर्देशनपत्रे आज शेवटच्या दिवसापर्यंत सादर करण्यात आली आहेत. भाजपा, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती फिस्कटली तशीच ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झाल्या असल्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरवले आहेत तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत अपेक्षित आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि दोन अपक्ष उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही लढत पंचरंगी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, आता कोण-कोण उमेदवार माघार घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.
कालपर्यंत 63 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्यात सोमवारी दिवसभरात 62 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे एकूण 125 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी डमी अर्ज मिळून आठ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी संपल्यानंतर सर्वच पक्षाच्या उमेदवाराने आपापल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. तर उद्या 18 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे.
दरम्यान सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होणार असून युती आणि आघाडी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेतही बंडखोरी झाली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या नावामध्ये ऐन वेळेला बदल करण्यात आला असल्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. 20 जागांसाठी 125 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये डमी उमेदवारी अर्ज चा ही समावेश आहे तर प्रत्यक्षात सहा उमेदवारी अर्ज उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर श्रद्धा भोसले सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिंदे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर ॲड. नीता सावंत कविटकर, ठाकरे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर सीमा मठकर यानी तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मवर साक्षी वंजारी, अपक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आणि निषाद बुरान यांनी नगराध्यक्ष पदाला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.