कणकवली : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यास भाग पाडणार्या मिंधे गटाच्या विरोधात जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. 2024 मध्ये जनता मतदानाच्या हक्काचा वापर करून सत्तेवर बेकायदेशीररीत्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पाडाव करून मविआला बहुमतांनी विजयी करेल आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हेच असतील, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी सकाळी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात, तर सायंकाळी सावंतवाडी येथे शिवसंवाद शिवगर्जना मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी सुभाष देसाई बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रदीप बोरकर, आ. वैभव नाईक, रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख नेहा माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, तालुका संघटक वैदेही गुडेकर, संजना कोलते, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, राजू शेट्ये, राजू राणे, युवासेनेचे पदाधिकारी राजू राठोड, दिव्या साळगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाई म्हणाले, 2024 साली भाजपला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत, ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. आज मातोश्रीवर अनेक निष्ठावंत येत आहेत. आंबेडकर चळवळीपासून कम्युनिस्ट आणि मुस्लिम संघटना तसेच दिल्ली, पंजाब राज्याचे मुख्यमंत्रीही येत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे हे न डगमगणारे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यापुढे काम करा.
आ. वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून 450 कोटींची कामे सुरू केली आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष आपल्यासाठी नवा नाही. यश निश्चितच मिळेल. परंतु, प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. संदेश पारकर, सतीश सावंत, नेहा माने, अतुल रावराणे, संजय पडते, नीलम सावंत-पालव यांनी उद्भव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.