देवगड; सूरज कोयंडे : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त 'भेटी लागे जीवा लागलीसी आस' अशी भावना प्रत्येक शिवभक्तांची झाली आहे. भाविकांची पावले कुणकेश्वरमध्ये पडू लागली आहेत. यावर्षी यात्रेचा कालावधी तीन दिवस असून, यात्रा कालावधीत देवदर्शन व तीर्थस्थानाकरिता भाविकांचा महासागर उसळणार आहे. यात्रा कालावधीत श्री देव कुणकेश्वराचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. सोमवारी सोमवती अमावस्या असल्याने भाविकांना धार्मिक विधी व तीर्थस्नानासाठी पर्वणी असणार आहे.
यात्रेत कुणकेश्वर भेटीसाठी श्री देव लिंगेश्वर पावणाई असरोंडी-मालवण, श्रीजयंती देवी पळसंब, श्री देव रवळनाथ वायंगणी या तीन देवस्वार्या तीर्थस्नानास येणार आहेत. भजन मंडळे यावर्षी यात्राकालावधीत भजन सादर करणार आहेत. यात्रा कालावधी तीन दिवसांचा असल्याने सोमवारी पहाटेपासून समुद्रकिनार्यावर धार्मिक विधी, देवस्वार्यांचे व भाविकांच्या तीर्थस्नानाला सुरुवात होईल. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना दर्शन घेणे,मंदिर परिसर व समुद्रकिनारी जाण्या-येण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याचे नियोजन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.भाविकांसाठी पाणपोई व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. व्यापार्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील याठिकाणी उभारले आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई,हॉटेल्स,मालवणी खाजा,कापड दुकानांनी यात्रा परिसर फुलून गेला आहे.यावेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपरिक शेतीअवजारे विक्रीस आली आहेत.तसेच कुणकेश्वरच्या समुद्र किनारही भेल,आईस्क्रिम,इतर हॉटेल्स यामुळे समुद्र किनारा दुकानांनी भरून गेलेला दिसून येत आहे.
कुणकेश्वर यात्रोत्सवाच्या नियोजन सभेत ग्रामस्थ तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून वारंवार रस्त्यांचा विषय उपस्थित झाला होता.याची दखल शासनस्तरावरून घेवून कुणकेश्वरकडे जाणार्या सर्व रस्त्यांचे सुस्थितीकरण व डांबरीकरण करण्यात आले.देवगड तारामुंबरी मिठमुंबरीमार्गे जाणार्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले आहे. सुरूच्या बनामधून जाणार्या रस्त्याला माती टाकून सुस्थितीत करण्यात आला आहे.सर्व रस्ते चकाचक करण्यात आले आहेत यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागामार्फत 123 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.24 तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी दोन पथके कुणकेश्वर प्राथमिक शाळा, भक्तनिवास येथे कार्यरत राहणार आहेत. पाणीशुध्दीकरण आणि पिण्याचा पाण्याची तपासणी यासाठी दोन पथके कार्यरत आहेत.चार रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. वीजप्रवाह सुरळीत राहण्यासाठी वीज वितरणची टीम तैनात करण्यात आली आहे.
यात्रेसाठी देवगड व विजयदूर्ग आगारातून एकूण 31 फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवगड एस्टी आगारातून एकूण 26 फे-या असून यामध्ये देवगड ,जामसंडेमधून 14, शिरगाव 1, तळेबाजार 1, रेंबवली 1, चाफेड 1, वळीवंडे 1, मोंडतर 1, इळयेसडा 1, तेलीवाडी 1 अशा फेर्या सोडण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतुक कोंडी कमी प्रमाणात होईल.तीन ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.यामध्ये तारामुंबरी मिठमुंबरी पुल मार्गावरून जाणार्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजिक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणार्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, आचरा मिठबांव मार्गावरून येणार्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रोत्सवाकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून उपविभागीय पोलिस अधिकारी 1, पोलिस निरिक्षक 6, स.पो.निरिक्षक 6, पोलिस निरिक्षक 10 असे एकूण 23 पोलिस अधिकारी आणि पुरूष व महिला पोलिस कर्मचारी 130 एकूण 153 पोलिस अधिकारी कर्मचारी याबरोबर 108 होमगार्ड, आरसीपी जवान यांची 30 जणांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. देवगड पोलिस निरिक्षक नीळकंठ बगळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कुणकेश्वरच्या पहिल्या पुजेसाठी येण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवस्थान ट्रस्टला दिले होते. मात्र, पुजेला न येता यात्रेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री येणार या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली.16 रोजी सायंकाळपासून पोलिस खात्याकडून रंगीत तालीम घेवून देवगड कॉलेज येथे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती.सकाळपासून पोलिस प्रशासनाचे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी देवगड येथे दाखल झाले होते.जिल्हयातील सर्व पोलिस यंत्रणा तैनात होती. अग्निशामक दलाच्या गाड्या, आरसीपीच्या दोन तुकड्या, बाँम्बशोधक नाशक पथक तसेच 200 हून अधिक कर्मचारी तैनात होते मात्र, सकाळी 9 वा.मुख्यमंत्र्याचा दौरा रद्द झाल्याचे समजताच सर्व पोलिस बंदोबस्त कुणकेश्वर यात्रोत्सवा ठिकाणी पाठविण्यात आला.