सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध, मग विकासकामे का नाहीत?

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध, मग विकासकामे का नाहीत?

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत, असे मंत्री दीपक केसरकर हे रोज सांगतात. मग त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेत मतदारसंघात दिलेली विविध आश्वासने आणि प्रलंबित प्रश्न तरी सोडवा, यासाठी तुम्हाला कोणी अडविले आहे? असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ना. दीपक केसरकरांना केला. त्यांनी जाहीर केलेले विविध विकास प्रकल्प का रखडले, याचा जाब आता पत्रकारांनीच केसरकारांना विचारावा, असा सल्ला तेली यांनी दिला. सावंतवाडी येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. तेली म्हणाले, जिल्ह्यातील डी. एड.उमेदवारांचा प्रश्न सुटला पाहिजे. त्यासाठी आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जिल्ह्याचे सुपूत्र दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असतानाही ते हा प्रश्न का सोडवू शकत नाही. याचे उत्तर त्यांना त्रकारांनीच विचारावे, असा सल्ला त्यांनी दिला. भाजपा जिल्हा प्रवक्ते आणि माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, भाजपा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.

ठाकरे गटाकडून नुकतेच मंत्री केसरकर यांच्या विरोधात एप्रिल फुल आंदोलन करण्यात आले. यापूर्वी श्री. तेली यांनी ना. केसरकर हे निष्क्रिय पालकमंत्री असल्याचे तसेच ते आश्वासने देवून लोकांची फसवूणक करत असल्याचे आरोप करत होते. याबाबत तेली यांना विचारले असता, त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम रहात आता त्यांना पत्रकारांनीच जाब विचारावा असे सांगितले.

ते म्हणाले, मी या ठिकाणी उपक्रम जाहीर करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात जास्त काही बोलणार नाही. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आपले खास संबध असल्याचे केसरकर नेहमी सांगतात. मग त्यांच्या माध्यमातून ते जिल्ह्यातील प्रलंबित असलेली आणि रेंगाळलेली विकासकामे का पूर्ण करत नाहीत? किमान त्यांनी स्वतः विकास कामांबाबत केलेल्या घोषणातरी पूर्ण कराव्यात, यासाठी त्यांना कोणी अडवले आहे? असा सवाल श्री. तेली यांनी केला. तुम्ही पत्रकार त्यांच्या घोषणांना प्रसिध्दी देता. मग आता पत्रकारांनीच त्यांना याबाबत प्रश्न विचारावेत, असा उलट सल्लाही त्यांनी दिला.

डी. एड. आंदोलकांकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, अशी ओरड आहे. याबाबत विचारले असता तेली म्हणाले, सिंधुदुग हा डोंगराळ जिल्हा आहे. त्यामुळे वेगळे निकष लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. खरेतर शिक्षण मंत्री म्हणून केसरकरांनी यात जातीनिशी लक्ष घालायला हवे होते, असा टोला श्री. तेली यांनी लगावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news