

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : होळी उत्सव दोन दिवसांवर आलेला असताना या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा येथून महाराष्ट्रात बेकायदा नेली जात असलेली तब्बल 19 लाखांची गोवा दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाकडून जप्त करण्यात आली. या प्रकरणी टेम्पो चालक गणेश सुभाष पाटील (45, रा.राठी, जि.धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
शनिवारी रात्री 11.45 वा. इन्सुली-सातजांभळी येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 लाख 20 हजार रुपये किमतीची गोवा दारूसह 10 लाखांंचा टेम्पो, असा एकूण 29 लाख 20 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अति. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, गुरुनाथ कोयंडे, पोलिस नाईक अमित तेली यांनी केली.