सिंधुदुर्ग: गणेशोत्सवात भजनाच्या गजरात अवघे कोकण दुमदुमले

सिंधुदुर्ग: गणेशोत्सवात भजनाच्या गजरात अवघे कोकण दुमदुमले
Published on
Updated on

सावंतवाडी : स्वप्निल उपरकर : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा व महत्वाचा सण मानला जातो. गणेश चतुर्थीपासूनच कोकणातील गावे, शहरे गणेश नामाच्या जयघोषाने दुमदुमून जातात. गावागावात रात्रभर सुरु असणाऱ्या भजनामध्ये तरुणाई आणि वयोवृध्द दंग होऊन जातात. पेटी, पंखवाज, झांज, ढोलकी इत्यादी वाद्यांचा नाद घुमत असतो. मुंबईहून आलेले चाकरमानी आणि स्थानिक लोकांमध्ये अभंगांची मैफिली झडतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीच्या अगोदर दोन महिने भजनांच्या तालमीला सुरूवात होते. प्रत्येक गावागावात वाडीवार भजनांची तालीम घेतली जाते. यामध्ये वेगवेगळया चालींचे अभंग, गौळणी, रूपक, गजर बसवून वातावरण संगीतमय करण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केला जातो. आणि या सर्वांचे प्रात्याक्षिक गणपतीच्या अकरा दिवसांत पाहावयास मिळते. गणेशाचे दीड दिवसाचं विसर्जन झाल्यानंतर भजनांना सुरूवात होते. या भजनांमध्ये पायपेटी, हातपेटी, तबला, पखवाज, ढोलकी, झांज आदींसह अनेक वाद्यांचा समावेश असतो. सध्या ओटवणे गावातही भजनांना सुरूवात झाली आहे.

भक्तीमय वातावरणात गणरायाची सेवा

रूप पाहता लोचनी, नाम बरवे, यशोदे तुझा खटयाळ कान्हा, खोडया करतो हा हरी, आई बापाची सेवा करा, थकलेले रे नंदलाला, तुच कृपाळा दैवत माझे अशा प्रकारच्या अनेक रूपक, अभंग, गजर, गौळणींचा समावेश सर्वच भजनांमध्ये ऐकावयास मिळत आहे. काही ठिकाणी हिंदी, मराठी सिनेगीतांच्या चालीवरही अभंग बसवलेले असून सर्वच कोकणवासीय या भक्तीमय वातावरणात गणरायाची सेवा करतात. शेवटी धाव घली विठू आता याने भजनाची सांगता होते व घराघरात गणरायाची आरती केली जाते. भजन संपल्यानंतर प्रत्येकाच्या घरात भजन मंडळींसाठी अल्पोपहाराची सोय केलीली असते. यात पारंपरिक पध्दतीच्या उसळया, पोहे, करंज्या, लाडू, शेव, चिवडा, फरसाण, कांदा, बटाटा, मिरची भजी, बटाटा वडे, पावभाजी यासारख्या नवनवीन पदार्थांची मेजवानीच असते.

कोकणला म्हणूनच यामुळे प्रति पंढरपूर असे म्हटले जाते. येथे प्रत्येक सणावारात भजनाला तितकेच महत्व आहे. गणेशोत्सवात या भजन पध्दती प्रत्येक ठिकाणी अनुभवता येतात. कोकणातील या पारंपरिक भजनांमुळेच सणावारांना महत्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव काळात भजनात कोकण दंग झाला असून सगळीकडे हरीनामाचा गजर दुमदुमत आहे.

गौरी पूजन

गणेशोत्सवात गणपती पूजनासोबत गौरी पूजनालाही तेवढेच महत्व आहे. गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून गौरी पुजनाला सुरूवात होते. पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन व तिसऱ्या दिवशी विसर्जन असा तीन दिवसीय गौरी पूजनाचा कार्यक्रम असतो. यात पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाऊन पाण्याची पूजा करून हळद, तिरडा, आगाडा, लाल भाजीचं मूळ, हरण अशा पाच वनस्पतींची पूजा करून गौरी घरी आणल्या जातात. प्रत्येकाच्या पारंपरिक पध्दतीप्रमाणे गौरी पूजन केले जाते. तीन, दोन व एक दिवस असे गौरी पुजन करून गौरीच्या समोर हौसा भरला जातो. हिंदू धर्मातील इतर सणांपेक्षा गौरी पूजनाचा सण सुहासिनींसाठी खूप आनंदाचा व उत्साहाचा सण मानला जातो.

सुपात हळद, काकडी, कारंदा अशा पाच प्रकारच्या पानांत पाच प्रकाराची फळे सोबत लाह्या, पोहे, खोबरे, शेंगदाणे इत्यादींचा समावेश असलेलं हौशाचं वाण सुहासिनी एकमेकींना देऊन हा सण साजरा करतात. व गौरी विसर्जनाच्यावेळी पाच प्रकारच्या पालेभाज्या एकत्र करून केलीली भाजी व पाच प्रकारच्या पीठाची भाकरी करून गौरीला नैवद्य दाखवून विसर्जनाठिकाणी एकमेकींना हा प्रसाद वाटून गौरी विर्सजन केले जाते. असा गणपती उत्सव मोठया थाटामाटात आनंदाने कोकणात घरोघरी साजरा केला जातो.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news