

मडुरा : पुढारी वृत्तसेवा : मडुरा-डिगवाडी जवळील काजू बागेत काजू गोळा करताना अचानक विद्युतभारित वीज वाहिनी काजूच्या झाडावर कोसळली. वाहिनी शेतकऱ्यापासून अवघ्या चार फुटाच्या अंतरावर पडल्याने सुदैवाने शेतकरी बचावला. वीज वितरणच्या गलथान कारभाराचा फटका आम्हाला बसून जीव गमवावा लागला असता. वारंवार वीज अधिकाऱ्यांना सांगूनही अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे २० मार्च रोजी मडुरा महसूल मंडळ अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा काजू बागायतदार वालावलकर यांनी दिला आहे.
शेतकरी प्रकाश रविवारी दुपारच्या सुमारास काजू बागायतदार शेतकरी प्रकाश वालावलकर हे आपल्या काजू बागेत काजू गोळा करत होते. त्याच दरम्यान अचानक खांबावरील लोखंडी कॅप तुटून विद्युतभारित वाहिनी काजूच्या फांदीवर पडली. वाहिनी अंगावर येणार हे लक्षात येताच प्रसंगावधान राखत त्यांनी आपला जीव वाचवण्यात यश मिळविले.
दरम्यान, वीज वितरणच्या दुर्लक्षामुळे आपल्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे काजू गोळा करण्यास जावे की घरी बसावे याचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे. एकंदरीत सर्व वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी २० मार्च रोजी मडुरा महसूल मंडळ कार्यालयासमोर सहकाऱ्यांसोबत उपोषणास बसणार असल्याचा इशारा वालावलकर यांनी दिला.