

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : 'एक मराठा, लाख मराठा', 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीत मराठा समाजाने अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील घटनेचा निषेध केला. सकल मराठा समाज क्रांती मोर्चातर्फे हे निषेध आंदोलन पार पडले. यावेळी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंंदोलनाला मंगळवारी सकाळी मराठा बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंतरवली येथील घटनेचा व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला. क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीत सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे यांनी पाठींबा देत आंदोलनस्थळी येऊन पत्र दिले. राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी खासदार नीलेश राणे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस यांनीही आंदोलना पाठिंबा दर्शवला. यावेळी मराठा मंडळांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देत घटनेचा निषेध केला. यावेळी प्रताप सावंतदेसाई, कौस्तुभ सावंत, सुधाकर सावंत, प्राची शिंदे, नंदू चव्हाण, शंकरराव मिलके, रुपाली सावंत, मानसी साळुंके, राजेंद्र महाडिक, संतोष तावडे, किशोर मोरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्यथा आंदोलन तीव्र करणार
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा निषेध करत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याची भूमिकाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.