

देवरुख : संगमेश्वर जवळच्या शिवणे सनगरेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. रोजच्या संसारासाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या साक्षी मंगेश पवार यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. यात महिला जखमी झाली.
प्रणिता सनगरे, सुप्रिया सनगरे आणि साक्षी पवार नेहमीप्रमाणे तिघी मिळून जंगलात सरपणासाठी गेल्या होत्या. पण अचानक बिबट्या पुढे आला आणि क्षणात साक्षी पवार यांच्यावर झेपावला. जोरदार पंजा मारताच त्या पायावर गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. वेदनेने हालचालही कठीण झालेल्या साक्षी पवार यांनी क्षणात हार न मानता बिबट्याला प्रतिकार केला. मृत्यू समोर उभा असताना त्यांनी जोरात बिबट्याला ढकलले. त्याचवेळी प्रणिता आणि सुप्रिया सनगरे यांनी जीवाचा जोर लावून आरडा ओरड सुरू केली.
या भीतिदायक आवाजाने चकित झालेला बिबट्या जंगलात पसार झाला आणि साक्षींचे प्राण अक्षरशः थरारातून परत आले. साक्षी म्हणाल्या, बिबट्याने अचानक झडप घातली. पळायला जागाच नव्हती. जखमी अवस्थेतही मी त्याला दूर ढकललं आणि माझ्या सोबतच्या दोघींनी मदत केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला माझी मान सापडली नाही.
मंगळवारी सकाळी 11.30 वा. सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. साक्षी पवार यांच्यावर तातडीने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गावकर्यांमध्ये मात्र आजही त्या काही क्षणांची दहशत जिवंत आहे, कारण रोजच्या जगण्याच्या शोधात निघालेल्या तीन महिलांनी मृत्यूला इतकं जवळून पाहिलं, की त्या आठवणींचा थरार बराच काळ विसरता येणं कठीण आहे.