

Veer Savarkar Jayanti Patit Pavan Mandir
रत्नागिरी : अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा आणि पुजा-अर्चा करु शकावेत यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून बांधण्यात आलेले रत्नागिरीतील पतितपावन मंदिर आजही सामाजिक समतेचे आणि जातीभेद निर्मुलनाचे प्रतिक मानले जाते. १९३१ मध्ये उभारलेले हे मंदिर भारतातील अस्पृश्यांसाठी खुले केलेले पहिले मंदिर ठरले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त घेतलेला हा थोडक्यात आढावा.
पतितपावन मंदिराची स्थापना ही १९३१ मध्ये झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२४ ते १९३७ या काळात रत्नागिरी स्थानबद्ध असताना जातीभेदाविरुद्ध लढा दिला. मंदिरात सर्व जाती-जमातीतील लोकांना प्रवेश मिळावा, यासाठी सत्याग्रह सुद्धा केला होता. त्यावेळी भंडारी समाजाचे नेते श्रीमान भागोजीशेठ कीर यांना सावरकरांनी मंदिर बांधायला सांगितले. त्यानुसार कीर यांनी सावरकरांच्या प्रेरणेने सर्व जातींसाठी पतितपावन मंदिराची स्थापना केली.
पतितपावन मंदिर हे त्यावेळी भारतातले पहिले मंदिर मानले जाते जिथे दलितांना (अस्पृश्यांना) प्रवेश देण्यात आला. त्यावेळी या मंदिरावर तब्बल ३ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. पतितपावन मंदिर हे सामाजिक सुधारणेच्या कार्याचे ठळक उदाहरण आहे. हे मंदिर रत्नागिरी शहरात आहे. त्याची वास्तुशैली साधी पण प्रभावी आहे. मंदिराचे बांधकाम सामाजिक समतेच्या संदेशाला पुरक असे आहे. आजही या मंदिरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. हे मंदिर सावरकरांच्या सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र लढ्यातील योगदानाची आठवण करुन देते. अर्थात रत्नागिरीतील हे पतीत पावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक सुधारणेचे प्रतिक आहे.