

खेड : कोकणातील मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा गुरुवारी ४ रोजी भाजपमध्ये होणारा प्रवेश अखेर स्थगित करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण विषयक वाद चिघळू लागल्याने व कोकणातील नेतृत्व नारायण राणे यांची प्रकृती ठीक नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी चार दिवसांनंतर तो होईल, अशी माहिती वैभव खेडेकर यांनी पुढारी सोबत बोलताना दिली.
नितेश राणे यांच्या नेतृत्वात खेडेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याच्या उपस्थितीत गुरुवारी ४ रोजी भाजप प्रवेश होणार होता. या प्रवेशासाठी खेडेकर समर्थकांनी मोठी तयारी केली होती. मात्र, आज अचानक सकाळी खेडेकर यांनीच माध्यमांना संदेश पाठवून “आजचा पक्षप्रवेश स्थगित असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,” अशी माहिती दिली.
कोकणात खेडेकर समर्थकांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश सोहळा गाजेल अशी अपेक्षा असतानाच अचानक कार्यक्रम रद्द झाल्याने आता या प्रवेशावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
मात्र काल काही कोकणातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष श्रेष्ठींची भेट घेतल्या नंतर हा पक्ष प्रवेश लांबला की थांबवला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर खेडेकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याबाबत बोलताना खेडेकर म्हणाले, “भाजप प्रवेशाची तारीख ठरली होती. मात्र ना. रवींद्र चव्हाण यांनी फोन करून तुमचा प्रवेश माझ्या उपस्थितीतच होईल असे सांगितले आहे. तसेच ना. नारायण राणे यांच्या प्रकृतीबाबतही काही अडचण असल्याने चार दिवसांनी जल्लोषात प्रवेश होईल,” असे वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.