

खेड शहर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला. यानंतर खेड येथील माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला. परंतु, दोनवेळा वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त हुकला आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ज्या पक्षासाठी २० वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो. त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे फळच दिल्याची भावना खेडेकर यांनी बडतर्फी आदेश निघताच बोलून दाखवली. गणेशोत्सव दरम्यान कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते.
शेकडो समर्थकांसह वैभव खेडेकर हे पक्षप्रवेशाची तयारी करत असताना मात्र ओबीसी व मराठा आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली. भाजप नेते, खासदार तथा माजी मंत्री नारायण राणे यांची पण तब्येत त्याच दरम्यान बिघडलेली होती. हे पण एक कारण सांगण्यात आलेलं होतं.
वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो? याची उत्सुकता सर्व समर्थकांना लागलेली होती. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी ३ वाजता पक्षप्रवेश होणार होता, असे म्हटले जात होते. वैभव खेडेकर हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपा प्रवेशावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कोकणातूनसमर्थकांना मुंबईत आणले आहे. परंतु, त्यांचा भाजपा प्रवेश दोन दिवसांनी लांबल्याचे म्हटले जात आहे. मला माहिती होते की, पक्षप्रवेश होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो. मी भाजपाचे काम सुरू केले आहे.
पक्षप्रवेश ही फक्त औपचारिकता राहिली आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले आणि रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. यानंतर लगेचच आम्ही भाजपाचे काम सुरू केले, असे वैभव खेडेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
भाजपामध्ये पक्षप्रवेश होऊ नये, यासाठी कुणी विरोध करत आहे का, या प्रश्नावर बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, मी गल्लीतील कार्यकर्ता आहे. मी काही मोठा कार्यकर्ता नाही. मी २० वर्षे मनसेचे काम केले. यापेक्षा आता दुप्पट ताकदीने भाजपाचे काम करणार आहे. कोकणात कमळ फुलवण्याचे काम आम्ही करू अनेक जिल्हाध्यक्ष तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांची यादी सोबत घेऊन आलो आहे, असे सांगून माझा भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी केला. दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.