

राजापूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील जनतेने 2019 मध्ये महायुतीला विजय करून आपला कौल दिला होता; मात्र उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी समवेत सत्ता स्थापन केली होती, असा घणाघाती आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजापूर येथे केला. गेल्या काही वर्षांत या मतदारसंघाचा रखडलेला विकास जर दूर करायचा असेल आणि येथे विकासाची गंगा आणायची असेल तर महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनाच विजयी करून विधानसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता 100 टक्के येईल, असा आत्मविश्वास डॉ. सावंत यांनी दिला. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी सादर केला. त्या पूर्वी राजापूर शहरातील पाटील मळा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची जंगी सभा पार पडली. त्यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्ण सभागृह खचाखच भरले होते. त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेवेळी व्यासपीठावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, ज्येष्ठ उद्योजक आण्णा सामंत, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत, आमदार रवींद्र फाटक, राजापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दीपक नागले यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृह तुडुंब भरले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकणच्या विकासाचे खरे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांना दिले. मागील काही महिन्यात राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली. लोकाभिमुख योजना यशस्वीपणे राबविल्या गेल्या. त्यामध्ये महिला असतील, युवक असतील, शेतकरी असेल त्यासह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले. केंद्रात आणि राज्यात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे खर्या अर्थाने विकास झाला आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले. केंद्रात मोदीमुळे विकसित भारत घडत असताना राज्यासह कोकणच्या सर्वागीन विकासासाठी येथे महायुती सरकार आवश्यक आहे असे ते पुढे बोलताना म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आपण महायुतीचे राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारासाठी राजापुरात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
या पूर्वी सन 2019 च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीलाच विजयी केले होते. मात्र सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला समवेत घेऊन सरकार स्थापन केले, अशी टीका त्यांनी केली. मागील काही वर्षांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास रखडला. या मतदारसंघात पुन्हा विकासाची गंगा आणावयाची असेल, तर महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना विधानसभेवर निवडून पाठवायचे आहे, त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.या प्रसंगी कु. अपूर्वा सामंत यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीचा गौरव करीत ते राजापूरचे निश्चितच आमदार म्हणून विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.राजापूर शहरातील पाटील मळा येथे सभा पार पडल्यानंतर महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी राजापूर उपविभागीय कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
मागील दहा वर्षांत राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. आता दहा वर्षांनंतर आपल्याला या मतदारसंघात परिवर्तन करावयाचे आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा निर्धार केला आहे. या जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. तर महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी आपण राजापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगीतले.