

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी प्रस्तुत 'पुढारी न्यूज' विकास समीटमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सांवत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, 'मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार सदाभाऊ खोत, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, आयुष्यमान भारत योजनेचे राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, एमसीसीआयचे निवृत्त महासंचालक अनंत सरदेशमुख सहभागी झाले होते. या समीटमध्ये उद्योग, आरोग्य, महिला आणि कृषी या विषयांवर मान्यवरांच्या विचारांचे मंथन झाले. (health minister tanaji sawant pudhari news vikas summit 2024 programme)
माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत योजना राबवित असताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या जीवनपटच उपस्थितांसमोर मांडला. कोणतीही योजना आणण्यापूर्वी ती जगावी लागते आणि ती मी जगलो आहे, असे सांगून मंत्री सावंत म्हणाले, वाकाव (जि. सोलापूर) हे माझ मुळ गाव. गावात कोणतीही सुविधा नाही. आम्ही पाच भावंडे. कमावणारी कमी आणि खाणारी तोंड अधिक असल्यामुळे घरची परिस्थिती तशी हालाखीची. पाच भावंडांपैकी आम्ही दोघेजण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो तर तिघे मिळेल ते काम शेतात करत होते. वडील वारकरी सांप्रदायाचे त्यामुळे कुटुंबांचा संपूर्ण भार आईवर असे. आम्ही तिला अक्का म्हणायचो. शाळेतून आल्यानतंर खेळायला जाण्यापूर्वी चुलीपुढची स्वच्छता करायची, जळण आणून ठेवायाचे, पाणी, पीठ, काटवट द्यायचे आणि खेळायला जायचे हा आमचा दिनक्रम. परंतु शाळेतून घरी आल्यानंतर एक दिवस आक्का अंथरुण टाकून झोपल्याचे दिसले. आम्ही जवळ गेलो तर तिला थंडी वाजत होती. तिने गोळी आणून देण्यास सांगितले. पूर्वी किराणा मालाच्या दुकानात देखील ॲनासिनची गोळी मिळायची. गोळी आणून दिली ती खालल्यानंतर तिला बरे वाटले त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. पण ही घटना कधीही मी विसरू शकत नाही. सुरक्षित माता योजनेमागे हा अनुभव आणि ही प्रेरणा आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आपल्या कारकिर्दीमध्ये राबविण्यात आलेल्या योजनांपैकी सर्वाधिक लक्षात राहणारी योजना म्हणजे पंढरीची वारी, आरोग्याच्या दारी', ही योजना आपल्या आयुष्यभर स्मरणात राहील. या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवेची दखल सर्वांनी घेतली. या योजनेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसलाही नोंद घ्यावी लागली. सुरुवातीला तीन ठिकाणी आरोग्य कँप घेण्यात आले. आता त्यांची संख्या वाढवावी लागेल, असेही मंत्री सावंत म्हणाले.
आरोग्य हा माझा अधिकार ही योजना महाराष्ट्रासाठी लागू करण्याचा आपला विचार होता. त्याबाबत चर्चा देखील सुरू होती. परंतु ही योजना आपण लागू करू शकलो नाही याबद्दल मंत्री सावंत यांनी खंतही व्यक्त केली. ही योजना लागू केल्यास महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात निश्चित मोठी भर पडेल, असेही ते म्हणाले.