

मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हा वाद शमला असतानाच हरियाणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) गटाने ही मागणी पुन्हा उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने कोणाचेही नाव जाहीर केल्यास तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या नावाला माझा आताच पाठिंबा देतो, या भूमिकेचा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वज्रनिर्धार परिषदेत मंगळवारी पुनरुच्चार केला.
लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद - दादरच्या शिवाजी महाराज मंदिर सभागृहात झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. भाजपवर निशाण साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आमचा खांदा वापरला. खांद्याचे दोन अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायची इच्छा आहे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. संजय राऊत यांनी शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केले जावे, असे वक्तव्य दोन महिन्यांपूर्वी करून या वादाला तोंड फोडले. त्यानंतर ठाकरे यांनी स्वतः दिल्लीवारी करीत मुख्यमंत्री पदासाठी शब्द मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असा कोणताही शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला नाही. उलट विधानसभा निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, अशी भूमिका घेत काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ठाम भूमिका घेत हा मुद्दा बाजूला टाकला होता. त्यानंतर काही काळ शांत राहिलेल्या ठाकरे गटाने हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होताच पुन्हा उचल खाल्ली आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी रेटली.
मुख्यमंत्रिपदावरून कोणताही मतभेद नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते व माजी - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही ठाकरेंच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली. ठाकरे काय म्हणालेत ते मला माहीत नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांड निर्णय घेतील. मी काही त्यावर बोलणार नाही. संजय राऊत काय बोलतात त्यावर मी उत्तर देणार नाही, असे पटोले यांनी माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्र हा स्वाभिमानी असून येथील पुढच्या पिढ्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे. पण दिल्लीतील दोन ठग गुलामगिरीमध्ये जगू देणार नाहीत. त्यामुळे आपण या दोन ठगांची गुलामगिरी स्विकारायची काय, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. दुर्देवाने तुम्ही तिकडे बसले आहात. तुम्हाला कोणी ओळखत नसताना तुम्हाला खांद्यावर बसवून आम्ही तेथे नेले, हे आमचेच पाप आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. पण दोन ठग महाराजांचा महाराष्ट्र लुटताहेत. तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.