

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 5 मधील क्रांतीनगर येथे झालेली महायुतीची सभा चांगलीच गाजली. पालकमंत्री उदय सामंत यांनी या सभेत विरोधकांवर हल्लाबोल तर केलाच, पण त्यासोबतच प्रभागात दादागिरी करणार्या आणि अवैध धंदे चालवणार्यांना सणसणीत इशारा दिला. ‘माझ्या मतदारसंघात दादागिरीला स्थान नाही. कोणी एमडी किंवा गांजा आणत असेल तर भविष्यात निवडणुका लढवता येणार नाहीत, अशी पोलिस कारवाई केली जाईल,’ अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी गुंडांना दम भरला.
प्रभाग क्रमांक 5 मधून महायुतीकडून सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर कडक भाष्य केले. ते म्हणाले, ‘काही जणांना मी शिवसेनेचे पद देण्याचे, नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते, पण दादागिरी करून जर कोणी पद मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्यासारखा वाईट पालकमंत्री दुसरा नाही.
या जिल्ह्यात कायद्याचे आणि पोलिसांचे शासन चालते. कोण काय करतंय, कोण एमडी आणतंय, कोण गांजा आणतंय, या गोष्टी माझ्या कानावर आल्यात. मला खोलात जायला लावू नका, अन्यथा पोलिस अशी कारवाई करतील की भविष्यात निवडणूक लढवायचे स्वप्नही पाहता येणार नाही.’क्रांतिनगरमधील घरांच्या प्रश्नावर बोलताना सामंत यांनी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, सौरभ मलुष्टे आणि दीपक पवार यांच्या कार्याचा उल्लेख केला.
‘तुमच्या घराची मुदत संपली होती, तेव्हा साळवी यांनी प्रस्ताव तयार केला आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याला 30 वर्षांची मुदतवाढ दिली. ज्यांनी आपल्याला छप्पर दिले, त्यांच्या विरोधात मतदान करणे योग्य नाही. पुढील 4 वर्षे मीच पालकमंत्री असणार आहे, याचे भान नागरिकांनी ठेवावे,’ असा टोलाही त्यांनी नागरिकांना लगावला.
झोपडपट्टी पुनर्वसनाचा महत्त्वाचा मुद्दा मांडताना सामंत म्हणाले, “मी तुम्हाला शब्द देतो की येत्या वर्षभरात झोपडपट्टी पुनर्वसनाचा आराखडा तयार करून या ठिकाणी पक्की घरे बांधली जातील. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. जसा मी चांगल्या घरात राहतो, तसे माझे झोपडपट्टी बांधवही चांगल्या घरात राहिले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे.
मतदारांना सूचक इशारा देताना आणि भावनिक साद घालताना सामंत म्हणाले, ‘हल्ली ईव्हीएम मशीन आणि बॅलेट युनिटमुळे मतदान कुठे झाले हे बरोबर कळते. क्रांतिनगरने काय केले, नवला नगरने काय केले, हे सर्व समजते. त्यामुळे नाहक विकासकामांमध्ये कटुता नको. शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे आणि त्या झाल्यावरच तुमच्या प्रभागाचा विकास वेगाने होईल,’ असेही ना, सामंत म्हणाले.