

रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिंनींना घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी परतत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादुरूस्त झाल्याने रद्द झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आता एसटी परिवहन महामंडळातर्फे लवकरच हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. एसटी अचानक रद्द झाल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी म्हणून लवकरच हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिंनींना आधारच मिळणार आहे.
जिल्ह्यासह राज्यातील लाखो विद्यार्थी एसटीने शाळा, महाविद्यालयांत जातात. शालेय विद्यार्थी लांबचा पल्ला पार करुन एसटीने शाळेत येत असतात. काही वेळाला एक ते दीड तासाचा प्रवास करुनही विद्यार्थी शाळेत येत असतात. रत्नागिरी शहरात शिकण्यासाठी येणारी मुले ही हातखंबा, पाली, पावस, कोतवडे अशा लांबच्या पल्ल्यावरुनही शिक्ष्ाणासाठी येत असतात, मात्र काही वेळेला एसटी रद्द होते. बस नादुरूस्त होणे या समस्या येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा मुलांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाच्या वतीने मदतवाहिनी सुरू करण्यात येणार आहे.
यावर एसटीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून मदत मिळणार आहे. हे हेल्पलाईन लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच 31 विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणार आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी, विद्यार्थिंनीदेखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकणार आहेत. लवकरच हेल्पलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.