

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी विकासासाठी गेल्या तीन वर्षांत 37 कोटी रूपये देण्यात आले आहेत. या ठिकाणी 70 नवे उद्योग उभे राहिले आहेत. आता 70 उद्योगांचे पुढे 700 उद्योग कसे होतील? यादृष्टीने अभ्यास करून पुढे गेले पाहिजे. उद्योजकांचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे या एमआयडीसीत ज्या व्यक्तींच्या नावे गेली 25 वर्षे जे भूखंड वापराविना पडून आहेत, अशांना तात्काळ नोटिसा काढण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकारी यांना देत असून, संबंधितांकडून खुलासे मागविले जातील. जो योग्य खुलासा देईल त्याला भूखंडासाठी प्राधान्य दिले जाईल. पण योग्य खुलासा देणार नाही, आणि फक्त आपल्या नावाखाली नुसता प्लॉट ठेवायचा असे कोणाचे मनसुबे असतील तर ते पुढच्या 48 तासांमध्ये धुळीस मिळवले जातील, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.
कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांचा सत्कार कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असो.च्या वतीने शनिवारी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चरचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी आ. राजन तेली, असो. चे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सेक्रेटरी नकुल पार्सेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शशिकांत चव्हाण आदींसह उद्योजक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोसिएशन आणि बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने मंत्री सामंत व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
ना.सामंत म्हणाले, या एमआयडीसीला आपण गेल्या तीन वर्षांत 37 कोटी रूपये दिले. आम्ही केवळ नारळ फोडण्यासाठी,ओवाळून टाकण्यासाठी येत नाही, आम्हाला श्रेय घेण्याची सवय नाही. एमआयडीसी क्षेत्रामध्ये आपण किती विकासकामे केली, त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने तीन वर्षात 70 उद्योजक वाढले, हे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाला आ. नीलेश राणे प्रकृती कारणास्तव आले नाहीत. त्यांनी माझ्याकडे कुडाळातील मुलांसाठी खेळाच्या मैदानाची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी आचारसंहितेनंतर पूर्ण केली जाईल, अशी आपण ग्वाही देत असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत राज्यात तीन वर्षांमध्ये 67 हजार उद्योजक आपण निर्माण केले. यावरून किती वेगवान पद्धतीने आपले सरकार काम करतेय हे तुमच्या लक्षात आले असेल. राज्याने बांबू आधारित औद्योगिक धोरण आणले, याचे सर्व श्रेय सिंधुदुर्ग जिल्ह्याला असल्याच ना.सामंत यांनी सांगितले.आ.केसरकर म्हणाले, याठिकाणी उद्योग येत नाही, असे जे काही एमआयडीसीचे शल्य होते ते, उदयजी तुम्ही उद्योगमंत्री झाल्यानंतर तुमच्या पुढाकाराने दूर होऊन एमआयडीसीला नवीन प्रेरणा लाभली आहे. एमआयडीसी बहरत आहे. तसेच असो. राबवित असलेले उपक्रमही निश्चितच चांगले आहेत, असे त्यांनी सांगून गौरवोद्गार काढले.
मोहन होडावडेकर यांनी प्रास्ताविकात एमआयडीसीतील उद्योग व असोसिएशनच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, उद्योजकांचा ओढा कुडाळ एमआयडीसीकडे वाढला आहे, पण जागाच अपुरी पडत आहे. 770 एकर जागेत 900 भूखंड असून, जवळपास 300 युनिट कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जे रिकामे भूखंड पडून आहेत, त्याबाबत तडजोडीने मार्ग काढून ते उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मोहन होडावडेकर यांनी उद्योगमंत्र्यांसमोर केली. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले तर आभार सेक्रेटरी नकुल पार्सेकर यांनी मानले