

राजापूर : राजापूर नगर परिषदेला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आता राजापूर नगरपरिषदेची सत्ता महायुतीच्या हातात देणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगतानाच राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळेल आणि महायुतीचाच नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पारदर्शक कारभार करतील, असा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूर येथील जाहीर प्रचार सभेत व्यक्त केला.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील जवाहर चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ना. सामंत पुढे म्हणाले की, किरण सामंत आमदार झाल्यानंतर मागील वर्षभरात राजापूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे.
मागील पंधरा वर्षांत हा विकास का झाला नाही, याचा विचार जनतेने करावा. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता आहे. जर राजापूर नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता आली, तर घरचा नगराध्यक्ष म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून भरभरून निधी मिळेल. मतदानाच्या रूपाने येथील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला तर पश्चातापाची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राजापूर शहराला भेडसावणारा पूररेषेचा प्रश्न, गाळ उपशाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्य सेवेचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न यासह अन्य सर्व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचा नगराध्यक्ष गरजेचा आहे. पुढील पाच वर्षांत राजापूरातील बेरोजगारीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असेल, अशी ग्वाही देखील ना. सामंत यांनी यावेळी दिली.
महायुतीचे उमेदवार अशी विकासकामे करतील की भविष्यात विकासाची कामे पाहूनच नगर परिषद बिनविरोध होइल. पालकमंत्री म्हणून एकही विकासाचे काम शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नगराध्यक्ष व नगसेवक यांनी दर महिन्याला जनता दरबार घ्यावा, लोकांनी तुमच्याकडे नाही तर तुम्ही लोकांकडे जा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी राजापूर शहरातील पूर समस्या सोडवण्यासाठी 99 कोटी रुपयाचा डीपीआर तयार असून देवस्थान इनामचा प्रश्न, पर्यावरणाचा समतोल राखुन विकास आराखडा, रस्ते रुंदीकरण, रोजगाराच्या संधी, आयटीआय इमारत नुतनीकरण, सोलार प्रणीत नळपाणी योजना, पाण्याखाली जाणारे रस्ते काँक्रिटीकरण, भाजी-मछीमार्केट याची योजना, मायग्रेशन रोखण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रुती ताम्हनकर यांनी राजापूर शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध राहू अशी ग्वाही दिली.महायुतीच्या या प्रचार सभेत अविनाश लाड, राजन देसाई, महादेव गोठणकर, मजिद पन्हळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा संघटक विलास चाळके, राजन देसाई, अविनाश लाड, जगदीश राजापकर, भाजपा महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दीपक नागले, अशफाक हाजू, मजिद पन्हळेकर, अॅड. शशिकांत सुतार अॅड. यशवंत कावतकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्ता आल्यास पालिकेवर बारीक लक्ष : ना. सामंत
राजापुरातील प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे राजापूरवासीयांशी संवाद साधला. राजापूरच्या विकासाला निधी कमी पडू येणार नाही, चोवीस तास पाणी पुरवठा, पूररेषा व पुराचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दिलेला निधी योग्यरितीने वापरणारी लोकं हवी आहेत, त्यासाठी भाजपा महायुतीची नगरपालिकेवर सत्ता आल्यास माझे बारीक लक्ष नगरपालिकेवर राहील आणि विकासाचा रथ धावत राहील, अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली.