

रत्नागिरी : ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या टिळक आळीतील पिंपळपारावर यंदा शतक महोत्सवी गणेशोत्सव साजरा होत आहे. पिंपळ पाराच्या ठिकाणी असलेल्या श्री गणपतीच्या दर्शनासाठी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधीही आल्या होत्या. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर उपस्थित होते. याच पारावर स्वा. सावरकरांची भाषणे झाली आहेत. त्यांना ऐकण्यासाठी आजुबाजूच्या गावातून बैलगाडीतून ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.
रत्नागिरी शहरातील टिळक आळीतील गणेशोत्सव हा शिस्तबद्ध उत्सव म्हणून परिचित आहे. श्री गणपतीची आगमन, विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रम कोणतेही वादविवाद न होता पार पडतात. या सर्व कार्यक्रमांमध्ये मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वत:हून सहभागी होवून शिस्तीचे नियोजन करतात. याठिकाणची मूर्ती कै.वामनाराव गोगटे, कै.सोहनी पेंटर, कै. कृष्णा कांबळे पेंटर आणि भाटकर या मूर्तीकारांकडून घडवली जात होती. आता गेली काही वर्षे येथील मूर्ती श्रीधर गोखले यांच्याकडून घडवली जात आहे. येथील उत्सवाच्या प्रारंभापासून आजतागायत उल्हास व नंदू परांजपे आणि यशवंत जोशी यांच्याकडून अखंडपणे सुरू आहे.
टिळकआळी पिंपरपार देवस्थान हे एक पारावरचे धार्मिक स्थान होते. पुरातन पिंपळ वृक्षाच्या बुंध्याशी प्रथम मारूतीरायाची स्थापना झाली. त्याचबरोबर दत्त पादुका, शिवलिंगही स्थापित आहे. आता जिथे श्री गणपती मंदिर आहे तिथे वड आणि पिंपळ हे वृक्ष होेते. हे वृक्ष कोलमडल्यानंतर तेथे 1910 साली वर्गणी काढून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. पूर्वीपासून हा गणपती नवसाला पावणारा असल्याचेही सांगितले जाते.
पारावर पूर्वी चातुर्मासात पुराण वाचन होत असे. सिधये शास्त्री, विनायकराव जोशी यांच्यासह काही महिलांनीही याठिकाणी पुराण वाचन केले असल्याचे माहिती संकलन करणार्या दत्तात्रय गोगटे यांच्या माहितीपत्रकात आहे.
उत्सवाच्या प्रारंभापासून आजतागायत महानैवेद्य हा उल्हास व नंदू परांजपे त्याचप्रमाणे यशवंतकाका जोशी यांच्याकडीलच असतो. ही सेवा दोन्ही कुटुंबांकडून अखंडपणे सुरू आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात ठेवून टिळकआळी गणेशोत्सव मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सन 1978 मध्ये मारूती-गणपती पिंपळपार देवस्थान नावाने ट्रस्ट स्थापन झाली. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी 22 फेब्रुवारी 1927 रोजी येथील गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी स्वा.सावरकर उपस्थित होते. मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल न करता नूतनीकरण झाले असून या नवीन वास्तूत हा टिळकआळीचा शतक महोत्सवी गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम होत आहेत. शतक महोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक यांची ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे पुणे, इंदोर, नागपूर, बडोदा, कोलकाता या शहरांमधून उत्सव सुरू झाले. लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीत अर्थात रत्नागिरीतील टिळक आळीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.