

रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा
दोन महिन्यांपूर्वी चंपक मैदानात युवतीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणाला वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांमुळे कलाटणी मिळाली असून, तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे या अहवालामुळे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात युवतीला आरोग्यविषयक समस्या असल्यामुळे तिने आपल्यावर शारीरिक अत्याचार झाला असावा, असा गैरसमज करून घेत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चंपक मैदानात आपल्यावर अत्याचार झाल्याबाबत एका युवतीने 26 ऑगस्ट 2024 रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बी.एन.एस.चे कलम 64 (1) अन्वये गुन्ह्याची नोंददेखील करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी लागलीच 4 पोलिस अधिकारी व 7 पोलिस अंमलदारांचे एक विशेष तपास पथक नेमून तपास करण्याचे आदेश दिले होेते.
दरम्यान, या घटनेतील युवतीची जिल्हा शासकीय रुग्णालयात या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन त्याचे नमूने घेण्यात आले. त्या नंतर ते कोल्हापुरातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासात युवतीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर एकूण 26 साक्षिदारांची चौकशी करुन जबाब नोंदवण्यात आले. तसेच रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणचे सी. सी टी.व्ही. फुटेज तपासून त्या आधारे हा तपास करण्यात आला. या तपासानुसार संबंधित युवतीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे.