

कणकवली : २०२२ सालापासून ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी सुरू आहे. पुन्हा एकदा एसीबीने वैभव नाईक यांनी खरेदी-विक्री व्यवहार केलेल्या कणकवली प्रभाग क्र.१ मधील इमारत क्र.७ मधील गाळा व सीटी सर्व्हे क्र.४३२१ ही मिळकत (गाळा) एकच आहेत की स्वतंत्र याबाबतची माहिती नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून मागितली आहे. या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी आपल्या कितीही चौकशा करा, सर्व चौकशांना सामोरा जाईन; परंतु कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत बोलताना वैभव नाईक म्हणाले, २०२२ पासून आपली एसीबी रत्नागिरी यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशीला आपला त्यावेळीही विरोध नव्हता आणि आताही नाही. गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा आपली आपल्या संबंधित अनेक व्यक्तींची एसीबीने चौकशी केली, जबाब घेतले. अधिकारी बदलतात तशा पुन्हा चौकशा सुरू होतात किंवा राजकीय वातावरण बदलले की चौकशा सुरू होतात, हे खरे तर आपल्यावर अन्यायकारक आहे; परंतु काहीही असो ज्या चौकशा असतील त्याला आपण सामोरे जाईन; परंतु कुठल्याही दबावाला आपण बळी पडणार नाही. मात्र माझी पाच-पाच वर्षे चौकशी सुरू आहे, आपल्या सोबत ज्यांच्या चौकशा होत्या त्या बंद झाल्या आहेत. फक्त माझीच चौकशी सुरू आहे हे अन्यायकारक आहे.