

रत्नागिरी : राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे २ मे पासून १४ जूनपर्यंत उन्हाळ्या सुट्ट्या असणार आहेत. मात्र यंदाच्या वेळेस याचकाळात जनगणनेचे कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना यंदा उन्हाळी सुट्ट्या मिळणार नाहीत. यासंदर्भात परभणीचे शिक्षणाधिकारी संजय नाईकवाडे यांनी जनगणना काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप तरी आदेश काढले नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांना ही कोणतेही पत्रक आलेले नसल्याचे सांगण्यात आले.
२०११ नंतर आता जनगणना होणार असून पहिल्यांदा नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. जनगणनेचा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहे. १६ ते १४ जूनपर्यंत जनगणनेअंतर्गत घरयादी व घरांची गणना करायची आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मे पासून त्यांना गावागावातील घरांची गणना करून त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे कोणालाही सुट्टीच्या काळात मुख्यालय व शहर, गाव सोडता येणार नाही. २०२७ वर्षातील जनगणनेचा पहिला टप्पा २७ एप्रिलपासून सुरू होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर २० ते २५ दिवसात म्हणजेच जुलै महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना जनगणनेसोबत टीईटी अभ्यास करावा लागणार आहे.
शिक्षकांना तेवढ्याच दिवसाची विशेष रजा
जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जून या काळात पहिल्यांदा घरे मोजायची आहेत. फेब्रुवारी २०२७ पासून लोकसंख्येची तर १ मार्च २०२७ पासून जातिनिहाय जनगणना होणार आहे. त्यापूर्वी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार २७ एप्रिल ते ८ मे याकाळात प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे. पण उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना घरगणनेचे काम करावे लागणार आहे. त्या शिक्षकांना पुढे तेवढ्याच दिवसाची विशेष रजा घेता येणार आहे.
दिव्यांग शिक्षकांना सर्वेक्षणातून वगळा
एप्रिल महिन्यात जनगणनेसाठी शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वे करावा लागणार आहे. त्यामुळे या सर्वेमधून दिव्यांग शिक्षकांना वगळा, अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलिमा नाईक यांना नुकतेच देण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्टीत शिक्षकांकडून जनगणनेचे सर्वेक्षण करण्यात येणार संदर्भात अद्याप तरी आदेश आलेला नाही. नेहमीप्रमाणे शाळांना सुट्ट्याचे आदेश काढण्यात येईल. शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, जनगणने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून असा आदेश येऊ शकतो. त्यांचा आदेश आल्यानंतर अंमलबजावणी होईल. जनगणनेच्या सर्वेतून दिव्यांग शिक्षकांना वगळा, अशा मागणीचे निवेदन संघटनेकडून आले आहे.
— निलिमा नाईक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी