

अनुज जोशी
खेड : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेला मोठे यश मिळाले आहे. हा शोध दुर्गप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षण ठरत असून किल्ल्याच्या लष्करी रचनेबाबत नवी माहिती उजेडात आली आहे.
तळगड किल्ला हा रायगड किल्ल्यापासून अंदाजे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असून तो उंचीने कमी आणि ट्रेकिंगसाठी सोपा मानला जातो. शिवाजी महाराजांनी 1648 साली हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. तसेच 1659 मध्ये अफजलखान मोहीम काळात सिद्दीने या किल्ल्याला वेढाही दिला होता.
जरी रायगड ही छत्रपतींची राजधानी असली, तरी तळगडसारखे किल्ले तिच्या संरक्षणासाठी, परिसरावरील नियंत्रणासाठी आणि टेहळणीसाठी अतिशय महत्त्वाचे होते. तळगडावरील दरवाजे मुख्य प्रवेश, लष्करी हालचाल, टेहळणी आणि गुप्त मार्ग वापरासाठी उपयोगी ठरत असावेत. नुकताच शोधलेला गुप्त दरवाजा देखील अशाच संरक्षणात्मक व रणनीतीसाठी वापरात असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांकडून नकाशा आणि माहिती समजून घेतल्यानंतर दोन मोहिमा राबवल्या. पहिल्या मोहिमेत 15 ते 20 सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा हटवला, तर दुसर्या मोहिमेत तब्बल 45 ते 50 सदस्यांनी अत्यंत मेहनत घेऊन या शिवकालीन गुप्त दरवाज्याचा शोध लावत स्वच्छता करून आकर्षक रांगोळी आणि फुलांनी सजावट करण्यात आली. शेवटी शिवभक्तांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत महाराजांना अभिवादन केले.