

अनुज जोशी
खेड : खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागातील विकास, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेत ‘खेड शहर विकासाचा मुद्दा’ या विशेष मालिकेचा आजचा चौथा भाग.
प्रभाग क्रमांक 4 हा खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असून, या भागाची ओळख म्हणजेच सततचा रहदारीचा ताण, व्यापारी गजबज आणि रस्त्यांच्या दुरवस्थेने त्रस्त नागरिक अशीच झाली आहे.
लोकसंख्या व सीमारेषा : एकूण लोकसंख्या : 1457, अनुसूचित जाती : 56, अनुसूचित जमाती : 12
सीमारेषा : उत्तरेस डाकबंगला रस्ता,पूर्वेस प्रभाग क्र. 2 व 3, दक्षिणेस जगबुडी नदी, पश्चिमेस प्रभाग क्र. 589. प्रमुख परिसर: रेस्ट हाऊस परिसर, शिवाजी नगर, जुनी स्टेट बँक, बीएसएनएल ऑफिस, मराठा भवन, वैश्य भवन, प्रबोधनकार ठाकरे उद्यान, केजीएन पार्क परिसर.
या प्रभागातून भरणे, खेड, दापोली राज्य मार्ग जातो. शहराच्या मध्यातून जाणारा हा मार्ग रहदारीच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि शासकीय अधिकारी यांचा मुख्य प्रवासमार्ग आहे. परंतु या रस्त्याची दुरवस्था ही नागरिकांच्या संयमाची कसोटी घेत आहे. खड्डे, पाणी साचणे, आणि धुळीचा त्रास या गोष्टींनी नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे. पालिकेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हा या समस्येचा मूळ कारण मानले जात आहे. वेळोवेळी दुरुस्तीचे आश्वासन मिळाले, मात्र अंमलबजावणी मात्र शून्यच राहिली आहे.
राज्य मार्गालगत असलेले तसेच अंतर्गत पालिकेचे रस्तेही दुरवस्थेत आहेत. काही रस्त्यांवर तर खड्डे की रस्ता असा फरकच उरलेला नाही. वाहतुकीच्या सोयीसाठी नागरिकांनी स्वतःहून मुरूम टाकणे किंवा पाणी साचू नये म्हणून छोटे बांध घालणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
घनकचरा संकलनासाठी नियमित गाड्या न आल्याने अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग रस्त्यावर दिसतात. उघड्यावर टाकलेल्या कचर्यामुळे कुजण्याची दुर्गंधी, माशा, आणि डासांचा त्रास वाढला आहे. त्यातच सांडपाणी निचर्याची व्यवस्था नीट नसल्याने काही निवासी संकुलांमधून थेट सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ‘आरोग्य हा विषय निवडणुकीतील मुख्य मुद्दा व्हायला हवा’, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
शासकीय जागा आणि रस्त्यालगत दुकाने, फेरीवाले आणि तात्पुरती बांधकामे यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी कारवाई केली असली तरी सातत्याचा अभाव असल्याने अतिक्रमण पुन्हा उभे राहतात. या समस्येकडे ‘सातत्यपूर्ण उपाययोजना’ करण्याची गरज आहे.
या भागातील काही परिसरात पाणीपुरवठा अनियमित आहे. काही दिवस दोन वेळा तर कधी एक वेळ पाणी येते, तर काही वेळा कमी दाबाने येते. योग्य नियोजनाअभावी आणि पाइपलाइनच्या जुनेपणामुळे ही समस्या असल्याचे नागरिक सांगतात. प्रभाग क्र. 4 हा खेड शहराचा ‘मुख्य चेहरा’ असला तरी विकासाच्या बाबतीत हा चेहरा आज धुळीने माखलेला दिसतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी या भागातील रस्ते, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन या तीन प्रमुख मुद्द्यांवर ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. शहराचा चेहरा बदलायचा असेल, तर सर्वप्रथम त्याच्या हृदयातील प्रभाग चारला स्वच्छ, सुटसुटीत आणि सुरक्षित बनवावे लागेल.
(क्रमशः)