

चिपळूण : राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान चालू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नेतृत्व करत रिकव्ह या धनुष्य प्रकारात सावर्डे येथे राहणार्या सिद्धी साळुंखे हिला सांघिक कांस्यपदक मिळाले.
या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 20 विद्यापीठाचे संघ आले होते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळामध्ये धनुर्विद्या खेळात पदक मिळवणारी रत्नागिरी जिल्ह्यातील?सिद्धी साळुंखे ही एकमेव खेळाडू आहे. यावर्षी भटिंडा पंजाब येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेत ती सहभागी झाली होती. तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले.
त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एकूण 53 मेडल्स आजपर्यंत मिळवली आहेत. शाळेच्या वेळी ती एसव्हीजे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे सराव करत होती. आता ती पुण्यातील ओंकार घाडगे यांच्या अकॅडमीमध्ये सराव करत आहे. दहा वर्षे ओंकार घाडगे?यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तिला मिळालेले आहे. या कालावधीत भारतीय संघाच्या कोचिंग कॅम्पमध्ये जागा मिळाली होती. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होते आहे.