

रत्नागिरी : गोरगरीब, कामगारांना 10 रुपयांत पोट भरावे म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात 26 पैकी 12 शिवभोजन केंद्रेच सुरू आहेत, तर 14 बंद झाली आहेत. केंद्रचालकांना परवडत नसल्यामुळे, अनुदान कमी व वेळेवर येत नसल्यामुळे ती बंद झाली आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे जुलै महिन्याचे 8 लाख 34 हजार 895 अनुदान जमा झाले आहे. उर्वरित चार महिन्याचे अनुदान थकित असून, अद्याप त्यांना अनुदान मिळाले नसल्यामुळे केंद्रचालक अडचणीत आहेत. एकंदरित शिवभोजन केंद्रचालकांना अनुदान लवकर न दिल्यास उर्वरित ही शिवभोजन केंद्रेही बंद पडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
कमी किमतीत गोरगरिबांना भोजन मिळावे म्हणून सरकारच्या वतीने शिवभोजन योजना सुरू केली होती. या थाळीचा लाभ रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील गोरगरिब, कामगारांना मिळत होता. कोरोना काळात ही योजना कामगार वर्गासाठी तर आधारच बनली होती. मात्र चांगल्या पध्दतीने सुरू झालेल्या या योजनेला उतरती कळा लागली असून, केंद्र चालकांचे चार महिन्याचे अनुदान थकीत आहे. जून महिन्याचे अनुदान दिले आहे.
जुलैची प्रोसेस सुरू आहे. ऑगस्टसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. केंद्रचालकांना अनुदान न दिल्यामुळे केंद्र चालवण्यास अडचण येत आहे. शिवभोजन थाळीचा खर्च अधिक तर अनुदान कमी मिळत आहे. दुकानाचे भाडे, लाईटबील, कामगारांचा पगार हे भागवणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे लवकरात लवकर शिवभोजन केंद्रचालकांना अनुदान मिळावे अन्यथा शहरासह, ग्रामीण भागातील शिवभोजन थाळी बंद गुंडाळणार एवंढ मात्र निश्चितं.