

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून, पारा घसरला आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळा आरोग्यदायी मानला जातो. तरीही थंडीमुळे त्वचेशी संबंधित तक्रारीही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. याकाळात दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास होतो. सर्दी, खोकल्यासह विविध प्रकारचे आजाराने डोकेवर काढले आहे. अस्थमा, ह्दयविकार असणाऱ्या रुग्णांनी आपली तब्येत जपावी. रत्नागिरीकरांनो, हिवाळा आला आहे, प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाच महिने पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अखेर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीस सुरुवात झाली आहे. दापोली, लांजा, राजापूरसह इतर तालुक्यात ही थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे रत्नागिरीकर घरातून बाहेर पडताना स्वेटर, टोपी, मफलर घालून बाहेर पडत आहे. शरीरातील आर्द्रता कमी होत आहे. शरीरातून घाम बाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचा कोरडी पडत आहे. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया जवळपास बंद होत आहे. याचबरोबर तहानही कमी लागते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असून, परिणामी त्वचेचे विकास उद्भवत आहेत. थंडीमुळे दम्याबरोबरच वारंवार सर्दी, खोकल्यामुळे रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे डॉक्टारांच्या सल्ल्याने योग्य औषधाचा वापर करणे गरजेचे आहे. थंडीपासून संरक्षण करा अशा जाहिराती करून बाजारपेठेमध्ये विविध कंपन्याकडून औषधे उपलब्ध केली जातात. मात्र, त्या औषधांचा वापर केल्यानंतर दुष्परिणामांचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घेण्याची गरज आहे.