गणपतीपुळे; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्राला आलेल्या उधाणामुळे मोठ्या लाटा उसळत होत्या. या उधाणामुळे पाण्याची पातळी वाढून पाणी संरक्षक धक्क्यापर्यंत पोहोचले होते. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी भागातही जोरदार लाटा उसळत होत्या. गुरुवारी दुपारनंतर गणपतीपुळे समुद्रात पाण्याची पातळी वाढली होती. यावेळी मोठ्या लाटा समुद्रकिनार्यावर येऊन धडकत आहेत.
तसेच मोठ्या लाटा समुद्रकिनार्यापर्यंत येऊ लागल्याने अनेक पर्यटकांचे समुद्रकिनार्यावर ठेवलेले साहित्य पाण्यात भिजले. या मोठ्या लाटा समुद्रकिनार्यावर येऊ लागल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करावी, तसेच भाविक-पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबत माहिती व सूचना देणे आवश्यकता आहे.