

रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी शहरातील भगवतीबंदर येथील पाणभुयार स्पॉटजवळ समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचा 72 तास उलटूनही अद्याप शोध लागलेला नाही. परंतू पोलिस विभाग तिचा शोध घेण्यासाठी भाट्ये, खडपेवठार, काळबादेवी, आरेवारे, गणपतीपुळे, मिर्या, मिरकरवाडा, मांडवी या समुद्रकिनारी गस्त घालत असून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात वायरलेसव्दारे बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याबाबत मेसेज पाठवण्यात आला आहे.
तसेच गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची कोणतीही नोंद नाही. परंतू नाशिक येथील पिंपळगाव पोलिस ठाण्यात एक तरुणी बेपत्ता असल्याची नोंद असून तिच ही समुद्रात पडून बेपत्ता झालेली तरुणी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
परंतू समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत याबाबत निश्चित माहिती देता येऊ शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पिंपळगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या तरुणीचे पालक हे मुळचे हरयाणा येथील असून त्यांची बेपत्ता झालेली मुलगी ही नाशिक येथील एका बँकेत नोकरीला असल्याचे समजते. तिच्या पालकांना रत्नागिरीत एक तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच ते नाशिकहून रत्नागिरीत येण्यासाठी निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.