

Ganpatipule Temple Waves
गणपतीपुळे : काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे मंदिरात लाटेचा रुद्र अवतार, पाणी मंदिरामध्ये धडकले, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु अशी घटनाच घडली नसल्याचे स्थानिक तसेच पुजारी यांनी सांगितले. यामुळे ही बातमी खोटी ठरली आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खवळला होता. परिणामी उंच लाटा उसळत किनार्यावर धडकत होत्या. यातील एक मोठी लाट गणपतीपुळे मंदिरात शिरल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुळात असे काही घडलेच नसल्याचे समोर आले आहे. त्यातील उंच लाट उसळल्यानंतर मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत ही लाट आली होती. मात्र, मंदिराच्या आतमध्ये लाट पोहोचलेली नाही.
मंदिराच्या लगत असलेला प्रसाद लाईनसमोरचा भाग हा सपाट आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी या भागापर्यंत आले होते. मात्र, कोणत्याही प्रकारची यात हानी झालेली नाही. असे असतानासुद्धा सोशल मीडियावर मात्र चुकीच्या पद्धतीने अवास्तव असे मंदिरात पाणी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. यामुळे येणार्या पर्यटक, भक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. आजपर्यंत मंदिरात कधीही लाटेचे पाणी गेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
गणपतीपुळे येथे पावसाळ्यात दरवर्षी समुद्राला मोठे उधाण येते. मोठमोठ्या लाटा उसळत असतात. यातीलच एक लाट मंदिराच्या बाजूला असलेल्या गेटमधून प्रसाद रांगेच्या परिसरात धडकली. परंतु, थेट मंदिरात मोठी लाट घुसलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लाटांचे पाणी शिरले, अशी बातमी ही एक अफवाच ठरली आहे.
- रोहित चव्हाण, व्यावसायिक, गणपतीपुळे
प्रत्यक्षात मंदिरामध्ये पाणी शिरलेच नाही. चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात आहे. लाटांचे पाणी हे मंदिराच्या पायर्यांपर्यंत येते. पायरीला स्पर्श होवून ते पाणी परत जाते. दरवर्षी या लाटा उसळत असतात. आणि या लाटा मंदिर परिसरात येतात. परंतु, यावर्षी काही वेगळं असे अवास्तव आणि भयंकर झाल्याचे व्हायरल व्हिडीओतून दाखवले गेले आहे, हे चुकीचे आहे. पर्यटकांनी व भक्तांनी यावर विश्वास ठेऊ नये.
- डॉ. चैतन्य घनवटकर, मंदिर पुजारी