

रत्नागिरी : शाळांकडून सहलीसाठी खासगी बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता या खासगी बसेसच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्ह्यासह राज्यातील शाळांच्या सहलीबाबत शिक्षण विभाग, परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता यापुढे शालेय सहली एसटी बसेसमधूनच होणार आहेत. या आदेशानुसार स्कूल बस अथवा खासगी बसचा वापर केल्यास कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांनी लालपरीलाच पसंती दिली असून, 201 बसेसचे बुकिंग झाले होते. त्यातून लाखोंचा महसूल रत्नागिरी विभागाला मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातही 200 अधिक एसटी बसेसचे बुकिंग झाले आहे.
जिल्ह्यासह राज्यभरातील शाळांना आता सहलीसाठी केवळ लालपरी बस वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय सहली फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर विद्यार्थ्यांना संस्कृती, इतिहास, भूगोल आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे वॉटरपार्क, रिसॉर्ट, बगीचेऐवजी आता सहली ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शाळांनी सहलीसाठी एसटी बसलाच प्राधान्य द्यावे असे स्पष्ट नियम आहेत. नियंमाचे उल्ल्ांघन केल्यास शाळांवर कारवाई करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश सहायक परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
एसटी बसमुळे कोणत्याही भागात सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार, सहलीसाठी कमी खर्चात बस उपलब्ध होणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सरकारी स्तरावर हमी, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारा आणि सुरक्षित प्रवास मिळणार आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातील शाळा, महाविद्यालयांसाठी 9 आगारांतून विशेष बसची सोय केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शालेय सहलीसाठी लागणाऱ्या बसची मागणी करावी, असेही आवाहन रत्नागिरी राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने केले आहे.