Konkan Dams | कोकणातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा उपलब्ध
Konkan Dams
संगमेश्वर : गडनदी धरणातून सुरू असलेला विसर्ग.
Published on
Updated on
Summary
  • पाणीबाणी मिटण्यास मोठी मदत होणार

  • काही धरणांमधून नियंत्रित विसर्गही सुरू

  • शेतीसह नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

रत्नागिरी :कोकण विभागातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात अत्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. अनेक भागांतील पाणीबाणी मिटण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला असून, काही धरणांमधून नियंत्रित विसर्गही सुरू करण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात शेतीसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी धरणात ६६.३८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, या धरणातून ४१.४५८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच अर्जुना मध्यम प्रकल्पात ५४.०० द.ल.घ.मी. आणि नातूवाडी धरणात १८. ३७७ द.ल.घ.मी. साठा उपलब्ध असून नातूवाडीमधून ५.४७१ क्युसेक वेगाने विसर्ग केला जात आहे.

Konkan Dams
'अंजनवेल, वेलदूर, रानवी'चा चार कोटींचा कर थकीत

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणात १६५.७१ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) तर तानसा धरणात ११३.६०८ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्याला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात तब्बल ५३६.८८३ द.ल.घ.मी. इतका विस्तीर्ण जलसंचय झाला असून, मोडकसागर धरणातही १०७.३५१ द.ल.घ.मी. पाणीसाठा नोंदवला गेला आहे.

रायगड जिल्ह्यातील हेटवणे प्रकल्पाची साठवण क्षमता ५.१२ टीएमसी इतकी आहे. हा प्रकल्प आजतागायत ७८.९८ टक्के इतका भरला आहे. याशिवाय रायगडमधील एकूण २८ लघु प्रकल्पांपैकी २० प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहेत.

Konkan Dams
Savarde Railway Station | सावर्डे रेल्वे स्टेशनसाठी पादचारी उड्डाण पुलाला मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात ४४७.३६९ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. अरुणा धरणात ९२.०२५ द.ल.घ.मी. साठा असून, ६.५२ क्युमेक्सने विसर्ग सुरू आहे. कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्पात २५.४७४ द.ल.घ.मी. साठा जमा झाला असून तिथून २२.२८ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर देवघर धरणातही ९८.०२ द.ल.घ.मी. इतका समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती नवी मुंबई कोकण विभाग उपसंचालकांकडून प्राप्त झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news