

देवरुख – पुढारी वृत्तसेवा :
वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपरचालकाला भर रस्त्यात अडवून, त्याच्यावर बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याची गंभीर घटना बुधवारी संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
करजुवे ते माखजन मार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद एकनाथ साळुंखे (वय २५, रा. चिखली-साळुंखेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलेले असून, ते डंपरचालक म्हणून काम करतात. बुधवार, २६ तारखेला सकाळी साधारण ११.३० च्या सुमारास हर्षद साळुंखे हे त्यांच्या ताब्यातील क्रमांक एमएच-०८/एपी/६५३४ असलेल्या डंपरमध्ये करजुवे येथून वाळू भरून कडवई येथे जात होते.
दरम्यान, करजुवे गावाजवळील रस्त्यावर आरोपी सूरज उदय नलावडे (वय २६, रा. करजुवे वातवाडी, ता. संगमेश्वर) याने त्यांचा डंपर अडवला. आरोपी नलावडे हा डंपरजवळ आला आणि त्याने थेट डंपरची चावी मागितली. फिर्यादी साळुंखे यांनी चावी मागण्याचे कारण विचारत चावी देण्यास नकार दिला.
यामुळे आरोपी सूरज नलावडे संतापला. तो दारूच्या नशेत होता. त्याने तात्काळ आपल्या सोबत असलेली ग्रे रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी सुरू केली आणि ती डंपरसमोर आडवी लावून रस्ता पूर्णपणे अडवला.
यानंतर आरोपी नलावडे गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याच्या हातात सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक होती. त्याने बंदुकीचा धाक दाखवत डंपरचा दरवाजा उघडला आणि जबरदस्तीने डंपरची चावी काढून घेतली. “दम असेल तर माझ्या घरातून चावी घेऊन जा,” असा अवमानकारक व धमकीचा सुरात इशारा देत आरोपी चावी घेऊन तेथून पळून गेला.
या गंभीर प्रकारानंतर हर्षद साळुंखे यांनी तातडीने माखजन पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या अकर्सन्स क्र. 61/2025 नुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.आर.क्र. 133/2025 प्रमाणे आरोपी सूरज नलावडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 126(2), 352 (हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25(बेकायदेशीर शस्त्र बाळगणे) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.