

खेड : अनुज जोशी - राज्यातील आगामी नगरपरिषद निवडणुका जवळ आल्या असून, त्याआधीच कोकणातील राजकारणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. महायुतीमध्ये आतापर्यंत दडपलेल्या नाराजीला आता उघड रूप आले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्यक्ष महाविकास आघाडीशी हातमिळवणी केल्याचे स्पष्ट चित्र खेडमध्ये दिसले.
बुधवारी (२६ नोव्हेंबर) खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात झळकलेल्या मोठ्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांची संयुक्त छायाचित्रे होती. या पोस्टरमुळे खेडपासून ते संपूर्ण कोकणात “नवे राजकीय समीकरण” सुरू झाल्याची चर्चा रंगली.
या निवडणुकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने महायुतीमध्ये आधीपासूनच तणाव होता. राष्ट्रवादीच्या या हालचालीमुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिले जात आहे. कोकणातील भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी या त्रिकोणी महायुतीच्या गणितात हा मोठा बदल मानला जातो.
उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. “भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाढत्या अहंकारामुळे कोकणातील जनता पर्याय शोधू लागली आहे. महायुतीने लोकांच्या भावना दुर्लक्ष केल्या, त्याचा परिणाम आता दिसतोय,” अशी टीका त्यांनी केली.
जाधव पुढे म्हणाले, “ही निवडणूक कोकणातील राजकारणाची दिशा बदलून टाकेल. लोक महायुतीला योग्य धडा शिकवतील, याची आम्हाला खात्री आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत प्रवेशामुळे खेड नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आतापर्यंत महायुतीच्या समोर एकत्रित विरोधक म्हणून MVA काम करत होता, परंतु आता राष्ट्रवादीचीही ताकद आघाडीत मिळाल्याने खेडसह संपूर्ण कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
कोकणातील निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. अशा वेळी राष्ट्रवादीची सत्ता गटातून बाहेर पडून MVA मध्ये गेलेली हालचाल अनेक समीकरणांना हादरा देणारी आहे. विशेषतः कदम कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावर या घडामोडींचा परिणाम होणार, असे जाणकार सांगतात.
या संपूर्ण प्रकरणामुळे खेड नगरपरिषद निवडणूक आता केवळ स्थानिक घटना राहिली नसून, ती कोकणातील संपूर्ण राजकीय वातावरणाला नवीन दिशा देणारी लढत ठरणार आहे. महायुतीची गाठ घट्ट आहे का? आघाडीचं बळ वाढणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.