

रत्नागिरी : महसूल विभागातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष आणि विनाचौकशी होणार्या निलंबनाच्या कारवाया यामुळे महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी हे 19 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी आणि कर्मचारी समन्वय महासंघाच्या आणि रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. या वेळी सर्व अधिकारी उपस्थित होते. विधीमंडळात महसूल मंत्र्यांकडून अधिकारी व कर्मचार्यांच्या केल्या जाणार्या विनाचौकशी निलंबनाच्या घोषणांमुळे कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
महसूल विभागातील कर्मचार्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक अनेक मागण्या दीर्घकाळापासून शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या वारंवार पाठपुरावा करुनही निकाली काढल्या जात नसल्याने कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. समन्वय महासंघाने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल यंत्रणा पूर्ण ताकदीने उतरणार आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया आणि नैसर्गिक आपत्तीशी संबंधित तातडीची कामे या आंदोलनातून वगळली आहेत, जेणेकरुन जनतेच अत्यावश्यक कामे अडकणार नाहीत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, जोपर्यंत मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्या निकाली काढत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार महासंघाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालये आणि महसूल इतर विभागांच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे.