

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या 16 प्रभागांतील 32 नगरसेवक पदासाठी तब्बल 132 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार असून प्रभाग क्र.4 मध्ये सर्वाधिक 13 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. प्रत्येक प्रभागातून 2 उमेदवार निवडून जाणार आहेत. प्रभाग क्र.1, 9 आणि प्रभाग 14 मध्ये 10 उमेदवार आहेत. या निवडणुकीत प्रथमच आम आदमी पार्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे 26 तर पाठोपाठ उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे 25 उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असली तरी उमेदवार रिंगणात किती राहणार? हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
नगर परिषद निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर या उमेदवारी अर्जांबाबतची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी मध्यरात्र झाली. रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक अर्ज स्विकारणे, छाननी व इतर सर्व प्रक्रिया केली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपक्षांसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची गर्दी झाली. त्यामुळे या शेवटच्या दिवशी सर्वात जास्त अर्ज दाखल झाले. त्यामुळे इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मध्यरात्र झाली.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्र.1 मध्ये 10 उमेदवारी अर्ज, प्रभाग क्र.2 मध्ये 6, प्रभाग क्र.3 मध्ये 9, प्रभाग क्र.4 मध्ये 13, प्रभाग क्र.5 मध्ये 9, प्रभाग क्र.6 मध्ये 5, प्रभाग क्र.7 मध्ये 7, प्रभाग क्र.8 मध्ये 8, प्रभाग क्र.9 मध्ये 10, प्रभाग क्र.10 मध्ये 7, प्रभाग क्र.11 मध्ये 5, प्रभाग क्र.12 मध्ये 7, प्रभाग क्र.13 मध्ये 9, प्रभाग क्र.14 मध्ये 10, प्रभाग क्र.15 मध्ये 8 आणि प्रभाग क्र.16 मध्ये 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 25, शिवसेनेचे 26, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 11, बसपा 1, प्रहार जनशक्ती 4, भाजप 6, आम आदमी पार्टी 6 आणि काँग्रेसच्या 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल झालेली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर रिंगणात किती उमेदवार आहेत हे स्पष्ट होणार आहे.