Ratnagiri Crime : मुलाचे लग्‍न जुळत नसल्याने तणावात असलेल्या बेपत्ता महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीत सापडला

परचुरी गावावर शोककळा
Junnar News
मुलाचे लग्‍न जुळत नसल्याने तणावात असलेल्या बेपत्ता महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीत सापडलाFile Photo
Published on
Updated on

देवरुख : मुलाचे लग्‍न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून परचुरी येथून बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंजनी अर्जुन वेद्रे (५४ वर्षे, रा. परचुरी वेद्रेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परचुरी गावावर तीव्र शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंजनी वेद्रे यांच्या मुलाचे लग्‍न जुळत नसल्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक विवंचनेत आणि तणावाखाली होत्या. याच तणावातून २६ जून रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास, त्या घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेल्या होत्या. त्या घरी न दिसल्याने त्यांचे पती अर्जुन यशवंत वेद्रे व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नव्हता. अखेर याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची रितसर नोंद करण्यात आली होती.

पोलिस आणि नातेवाईक सर्व स्तरावर या महिलेचा कसून शोध घेत असतानाच, डिंगणी हद्दीतील खाडीपात्रात काठालगत एक मृतदेह अडकल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता, तो मृतदेह बेपत्ता अंजनी वेद्रे यांचाच असल्याची खात्री पटली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

डिंगणी उपक्षेत्राचे तपासिक अंमलदार अरुण बी. वानरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरारत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news