

चिपळूण: चिपळूण नगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र प्रभाग 9 व 10 मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजपा व शिंदे सेनेवर सोडला आहे. मात्र उद्या महाविकास आघाडीतील सुधीर शिंदे व ठाकरे सेनेचे राजू देवळेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष असून त्यावरच चिपळूणचे राजकारण ठरणार आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या निवडणूकीच्या नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवकपदासाठी 141 अर्ज दाखल झाले होते. महायुतीमधील शिंदे शिवसेनेचे उमेश सकपाळ, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मिलींद कापडी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
गेले दोन दिवस या मुद्द्यावरून महायुतीत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अन्य दोन जागांवर अडून बसले होते. प्रभाग 9 व 10 मधील दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादीची होती. मात्र त्या जागांवर भाजपने देखील आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिंदेसेना व भाजप यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू होती. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र तोडगा निघत नव्हता. अखेर पालकमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवीद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने महायुतीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. गुरूवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेले मिलींद
कापडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर प्रभाग 11 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमृता विलास कोंडविलकर यांनीही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्ययतीत 7 उमेदवार राहिले आहेत. उद्या दुपारी 3 पर्यत आणखी कोण माघार घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीने 2 जागांवर तडजोड केलेली नाही. महायुतीसाठी आम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे आता मित्र पक्षांचा विषय आहे. मित्र पक्षांनीही एक पाऊल मागे येऊन महायुतीचा धर्म पाळावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून आहे.