

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
आजारपणासोबत कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावचे आंबा व्यावसायिक रुपेश ऊर्फ बाब्या प्रकाश नागवेकर यांनी घरातच स्वतः वर शेती परवाना असलेल्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली.
कर्ज वसुलीसाठी वित्तीय संस्थांकडून तगादा लावला जात होता, असा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्यानंतर कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी धावत येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
तोणदे गावचे सरपंच, उपसरपंचपद भूषवलेले आंबा व्यावसायिक नागवेकर गेल्या अनेक महिन्यांपासून आजाराने त्रस्त होते. आजारपणासोबतच व्यावसायिक कर्जाचा भारही वाढला होता. त्यामुळे ते तणावाखाली होते, असे गावातून सांगितले जात आहे. त्यांच्या घरी जाऊन ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे.