

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे संचमान्यतेनुसार समायोजन न झाल्यामुळे ३ हजार ९०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे. त्यामध्ये २ हजार ८०० शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २४९ शिक्षक अतिरिक्त ठरले असून १६ एप्रिल रोजी त्यांचे समायोजन होणार आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाकडील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ३ हजार ९०० शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. त्या सर्वांच्या वेतनासाठी कोट्यावधीचे वेतन लागते. मार्च महिन्याच्या वेतनासाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वाट पाहत आहेत.
मात्र माध्यमिक शिक्षकांचे पगार संचमान्यतेच्या तपासण्यामुळे, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनामुळे थांबले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची कमालीची गोची झाली आहे. यामुळे हे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपले वेतन कधी होणार याकडे आस लावून बसले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार आता शाळांची संचमान्यता पूर्ण झाली आहे का, त्यांच्या सेवक संचातील पदे व कार्यरत पदे किती आहेत, प्रत्येक शाळेतील कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील २४९ अतिरिक्त शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या समायोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून शिक्षकांची यादीही झाली आहे. गुरुवारी शिर्के हायस्कूलच्या सभागृहात सकाळी ११ वाजता त्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच पगार होण्याची शक्यता आहे.
मार्च एण्डमुळे वेतनास उशीर माध्यमिक शिक्षकांच्या संचमान्यतेच्या प्रक्रियेमुळे पगारी थांबल्या तर मार्च एण्डमुळे प्राथमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शिक्षक, शिक्षण सेवक पगाराची वाट पाहत आहेत. याविषयी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलिमा नाईक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मार्च एण्डमुळे पगारी उशिरा होत आहे. येत्या दोन दिवसांत पगार होईल, असेही त्यांनी सांगितले.
पगार थांबल्यामुळे शिक्षक संतप्त
शिक्षकांचा पगार आता शालार्थ आयडीच्या पोर्टलवर स्वतंत्र टॅब तयार करून त्यातूनच केली जात आहे. त्यामुळे माहितीत तफावत असल्यास त्या शाळेचे वेतन बिल ऑनलाईन स्वीकारलेच जात नाही. फेब्रुवारीत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर कपात झाला असून मार्चचा पगार अजूनही झाला नाही. त्यामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे.
संचमान्यतेनुसार तपासण्याचे काम सुरू असून हरकतींवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता जिल्ह्यात एकूण २४९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन गुरुवारी होणार आहे. त्यानंतर सविस्तर अहवाल शासनास पाठवण्यात येणार आहे. आता शिक्षकांचा पगार शालार्थ आयडीच्या पोर्टलवर स्वतंत्र टेंब करून त्यातून केली जाणार आहे. लवकरच वेतनाचा प्रश्न सुटेल. -
दीपक मॅगाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी