

पदवीधर शिक्षकांच्या समायोजन तिढा सुटला
परजिल्ह्यातील स्थलांतर पालकमंत्र्यांमुळे टळले
Ratnagiri techer News
रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पदवीधर शिक्षक समायोजन प्रकियेला रत्नागिरी जिल्ह्यातच पूर्णविराम मिळाला असून २०२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णयमुळे जिल्ह्यातील तब्बल १०५७ शिक्षकांचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातच काम करण्याची संधी मिळाली आहे. घेतलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मराठी माध्यमाचे ११८ आणि उर्दू माध्यमाचे १७ अशा एकूण १३५ अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पार पडले आहे. समायोजन झाले नसते तर या शिक्षकांना सांगली, सातारा किंवा गडचिरोलीसारख्या लांबच्या जिल्ह्यामध्ये जावे लागले असते.
मात्र आता हे सर्व शिक्षक जिल्ह्यातच स्थिरावणार असल्याने शिक्षक संघटना आणि कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्रालयातील निर्णयाची यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद आवारातील लोकनेते शामराव पेजे सभागृहात रत्नागिरी तालुक्यातील शिक्षक समुपदेशन प्रक्रिया पार पडली. ही समुपदेशन प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पडली. यामध्ये सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, बीडीओ चेतन शेळके, गटशिक्षणाधिकारी डुबल, विस्तार अधिकारी दत्तात्रय सोपनूर, सरोज आखाडे, सुधाकर मुरकुटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.