

Rajapur News In Marathi:
नाटे : राजापूर तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळ उडाला. विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेले शिक्षक बलवंत आनंदा मोहिते हे पुन्हा शाळेत हजर झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली.
सप्टेंबर 2024 मध्ये संबंधित शिक्षकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात समजुतीने निर्णय घेऊन त्या शिक्षकाला शाळेत पुन्हा घेण्यात येणार नाही, असे ठरवण्यात आले होते. मात्र, सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी बलवंत मोहिते अचानक शाळेत हजर झाले. यामुळे संतप्त पालकांनी शाळेवर धडक मारून निषेध केला आणि शाळा प्रशासनाला जाब विचारला. ज्याच्यावर मुलींची गैरवर्तनाचे आरोप आहेत त्याला शाळेत पुन्हा कसा घेतला, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
सप्टेंबर 2024 पासून हा शिक्षक शाळेत हजर नव्हता, मात्र तरी त्याला शाळेबाहेर मस्टर देऊन आतापर्यंत सर्व पगार काढण्यात आला. आज त्याने आपण शाळेत हजर होत आहे, असे पत्र दिल्यावर त्याला शाळेत घेण्यात आले. याचाच अर्थ त्याला मुख्याध्यापक आणि प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्या शिक्षकाला शाळे बाहेर काढा अन्यथा आम्ही मुलांना शाळेतच पाठवणार नाही, असा निर्धार ही यावेळी पालकांनी केला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाटे पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ शाळेत दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवून संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर व त्यांचे सहकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.