लिंब : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिली आहे. असे असताना आनेवाडी टोलनाक्यावर बुधवारी मध्यरात्री टोलसाठी सुमारे 50 एसटी बसेस रोखण्यात आल्या. त्यामुळे एकच कल्ला उडाला. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. एसटी रोखल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरु होता. दरम्यानच्या काळात भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोलनाका प्रशासनाशी चर्चा करुन बसेस पुढील दिशेने मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवाळला.
कोकणात गणेशोत्सवासासाठी जाणार्या कार, जीप, एसटी बसेस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच टोलमधून राज्य शासनाकडून सूट देण्यात आली आहे. बुधवारी मुंबई, पुण्याच्या बाजूकडून आलेल्या एस.टी. बसेस कोल्हापूर, कराडवरुन खाली कोकणाच्या दिशेने निघाल्या होत्या. या बसेस आनेवाडी टोलनाक्यावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आल्या. त्यावेळी टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी चालकांकडे टोलची मागणी केली. त्यावर वाहक व चालकांनी कोकणात जाणार्या या बसेस असून टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र टोलप्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगून टोल घेतल्याशिवाय जावू देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूने ताठर भुमिका घेतली गेल्याने काळोख्या रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली.
टोलनाक्यावरील सर्वच लेनवर एसटी बसेस थांबल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली. अन्य वाहन चालक व प्रवाशांनींही संताप व्यक्त केला. एसटीतील गणेशभक्त व प्रवाशांनी तर आक्रमक होवून वाद घालायला सुरुवात केली. या वादावादीमुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. कोण कुणाचे ऐकत नव्हता. हमरीतुमरीने गलका उडाला. हे प्रकरण भुईंज पोलिस ठाण्यापर्यंत गेले. भुईंज पोलिस तातडीने टोलनाक्यावर पोहचले. त्यांनी एसटी वाहक-चालक व टोल प्रशासनाशी चर्चा केली. वाढत जाणारा तणाव, महामार्गावरील कोंडी यामुळे पोलिसांनी तातडीने मार्ग काढला. टोल प्रशासनाला टोल न घेताच एसटी बसेस सोडून देणे भाग पडले. त्यानंतर या बसेस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या.