

रत्नागिरी ः गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी, बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश दिले असून कोकण मंडळांतर्गत 175 केंद्रांपैकी 70 म्हणजे 40 टक्के केंद्रांनी आजअखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित 105 परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याबाबत विभागीय मंडळाने सूचना दिल्या आहेत. गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी चालू वर्षी सर्वच परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. दरम्यान सोमवार 12 जानेवारीपासून बारावीचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात येणार असून कोणतेही गैरप्रकार होवू नये यासाठी विभागीय मंडळाकडून व जिल्हा प्रशासनाकडून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या उपक्रमाने राज्यातील इ.10 वी व इ.12वी परीक्षार्थी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा सहभाग घेऊन परीक्षा पे चर्चा या सारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मागील परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 परीक्षेत भरारी पथकामार्फत एकही गैरमार्ग प्रकरण निदर्शनास आलेले नव्हते. तर बारावीच्या एका केंद्रावर एकमेव कॉपी प्रकार निदर्शनास आला होता. इ. 10 वी व इ.12 वी च्या एकाही परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता रद्द करण्यात आलेली नाही. चालू वर्षी एकाही केंद्रास नव्याने मान्यता देण्यात आलेली नाही. या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत एकुण 175 केंद्रे असून त्यापैकी 10 वी साठी 114 व इ.12 वी साठी 61 केंद्रे आहेत. परीक्षेसाठी 3,040 वर्गखोल्यांची आवश्यकता असून त्यापैकी 1712 खोल्यांमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित 1328 वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या संस्थाचालकांना निर्देश देण्यात आले आहेत.